जळगाव : सुरुवातीला तिस हजार व नंतर तडजोडीअंती 25 हजार रुपयांची लाच स्विकारणा0-या कोतवालासह या लाचेला प्रोत्सहन देणारा नायब तहसीलदार असे दोघे एसीबीच्या कारवाईत अडकले आहेत. धरणगाव येथील नायब तहसीलदार जयवंत पुंडलीक भट असे नायब तहसीलदाराचे तर राहुल नवल शिरोळे असे पाळधी तलाठी कार्यालयातील कोतवालाचे नाव आहे.
या घटनेतील तक्रारदाराच्या भावाच्या नावे दोन डंपर आहेत. हे दोन्ही डंपर वाळू वाहतूक व्यवसायासाठी वापरले जातात. त्यापैकी एक डंपर एरंडोल तहसील कार्यालयात जमा आहे. यापूर्वी देखील डंपर अडवून जागेवरच सोडून देण्यासाठी तक्रारदाराकडून 1 मार्च रोजी 30 हजार रुपये आणि 11 मार्च रोजी 23 हजार रुपये नायब तहसीलदार जयवंत भट यांच्या सांगण्यावरुन कोतवाल राहुल शिरोळे यांनी जागेवरच घेतले आहेत. त्यानंतर नायब तहसीलदार भट यांच्या सांगण्यावरुन तक्रारदाराने कोतवाल राहुल शिरोळे यांची भेट घेतली.
जमा असलेले डंपर आणि दुसरे सुरु असलेले डंपर अशी दोन्ही वाहने वाळू वाहतुकीसाठी विनाकारवाई सुरु ठेवण्याच्या मोबदल्यात प्रत्येकी पंधरा हजार अशा एकुण तिस हजार रुपयांची मागणी पंचासमक्ष भट यांच्या सांगण्यावरुन कोतवाल शिरोळे यांच्याकडून तक्रारदारास करण्यात आली. तडजोडीअंती 25 हजार रुपये देण्याघेण्याचे ठरले.
लाच स्विकारणा-या कोतवालस जागेवरच आणि त्याला प्रोत्साहन देणा-या नायब तहसीलदारास तहसील कार्यालय धरणगाव येथून ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उप अधिक्षक शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ.शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.ईश्वर धनगर, पो.ना.बाळू मराठे, पो.कॉ.राकेश दुसाने, सचिन चाटे, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.