सातारा – राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन वापरली जातात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्याचा दौरा केला होता. या भेटीत शरद पवारांनी ५० रेमडेसिवीर इंजेक्शन जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले होते. गरजू आणि गरीब रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत ही यासाठी ही भेट दिली होती.
यापूर्वी शरद पवारांनी सातारा जिल्ह्यासाठी १२५ रेमडेसिवीर इंजेक्शन दिली त्यानंतर ५० अशाप्रकारे एकूण १७५ रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात आली होती. सातारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला ही सुपूर्त केली होती. या इंजेक्शनचा वापर गरीब आणि गरजूंना करण्यासाठीच होती. मात्र सिव्हिल हॉस्पिटलच्या कोविड वार्डातून ही चोरीला गेल्याची चर्चा सातारकारांमध्ये सुरु आहे. ही इंजेक्शने २० ते ३० हजारांना बाहेर विक्री केली जात असल्याची चर्चा होती. यावर राष्टवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटलं आहे की, आमच्या माहितीप्रमाणे १७५ इंजेक्शनातील काही इंजेक्शन चोरीला गेल्याचे समजते. त्यामुळे ही इंजेक्शन कोणाकोणाला वापरली याचा तपशिल द्यावा व ती इंजेक्शने चोरीला गेली असल्यास आपण याबाबत सखोर चौकशी करुन दोषींवर त्वरीत फौजदारी गुन्हा दाखल करुन कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी केली आहेेे. .