जळगाव – गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचे दिसत आहे. सोन्याच्या दराने जवळपास साठी गाठली आहे. सुवर्ण नगरी जळगाव येथे देखील सोन्याचा दर 60 हजार प्रती तोळा असा पोहोचला आहे. शनिवारी नागपूर येथे सोन्याचा दर 60 हजार 100 रुपये प्रती तोळा असा होता. दरम्यान दोन दिवसांवर आलेल्या गुढी पाडवा सणापर्यंत भाववाढ कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमेरिकन बँका डबघाईला आल्याने सोने-चांदी या धातूंमधील गुंतवणूक वाढू लागली असून त्यांचे भाव वाढत आहे. शनिवार दिनांक 18 मार्च 2023 रोजी जळगावात सोने 60 हजार प्रती तोळा पोहोचले होते. चांदी मध्ये देखील वाढ झाली असून ती 69 हजार प्रती किलो पर्यंत पोहोचली आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हटला जाणारा गुढीपाडवा सण दोन दिवसांवर येवून ठेपला असून या दिवशी देखील मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले जाते. त्यामुळे या मुहूर्तावर आणखी भाव वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी 22 मार्चपर्यंत सोन्याचे दर काय राहतात याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे.