जळगाव : उधारीच्या वादातून दुकानदाराला कारमधे बसवून पळवून नेल्यानंतर धारदार चॉपर आणि बेसबॉल बॅटने धमकावल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी इंद्रकुमार साहित्या असे तक्रारदार दुकानदाराचे नाव असून जैनाबाद येथील सागर सैंदाणे आणि शेखर सपकाळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. जळगाव स्टेशन रोड येथे दिव्या ट्रेडर्स नावाचे सनी साहित्या याचे रेडीमेड कापडाचे दुकान आहे.
सागर सैंदाणे आणि शेखर सपकाळे या दोघांनी सनी साहित्या याला सात लाख रुपये उधार दिले होते. त्यापैकी दिड लाख रुपये दोघांना परत केले होते असे सनी साहित्या याचे म्हणणे आहे. 18 मार्च रोजी दिड लाख रुपये रोखीन परत दिल्यानंतर 23 मार्च रोजी रिंग रोड स्थित पु.ना.गाडगीळ या दुकानाजवळ दोघांनी सनी साहित्या याला बोलावले. याठिकाणी सनी साहित्या आल्यानंतर दोघांनी त्याला कारमधे बसवून जैनाबाद येथील इमारतीच्या चौथ्यामजल्यावर नेऊन धारदार चॉपर आणि बेसबॉल बॅटने धमकावल्याचा सनी साहित्या याने तक्रारीत आरोप केला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक गणेश देशमुख करत आहेत.