पोलिस अधिका-यांनी आपल्या दालनातील एसी काढावे – डॉ. बी.जी. शेखर

जळगाव : नियमबाह्य आणि अधिकार नसतांना पोलिस अधिक्षकांसह इतर अधिका-यांनी आपल्या दालनात बसवलेले एअर कंडीशनर काढण्याची मागणी जळगावचे सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी सातत्याने केली आहे. निर्धारीत वेतनश्रेणीनुसार जळगाव जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक या दोघा बड्या अधिका-यांना आपल्या दालनात एसी बसवण्याचा अधिकार नसल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक वगळता इतर कुणाही अधिका-याने अद्याप आपल्या दालनातील एसी काढले नसल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी दीपककुमार गुप्ता यांनी वेळोवेळी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरुच ठेवला आहे. जिल्हा पोलिस अधिक्षकांनी आपल्या दालनातील एसी काढल्यास इतर अधिकारी देखील आपल्या दालनातील एसी काढतील यात शंका नाही. स्वत: पोलिस अधिक्षक एसी काढण्यास तयार नसल्याचे दिसून येत असल्याचे लक्षात घेत इतर अधिकारी आपल्या दालनातील एसी काढण्यास तत्परता दाखवत नसल्याचे चित्र आहे.

दीपककुमार गुप्ता यांचा पाठपुरावा लक्षात घेत विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर यांनी जळगाव पोलिस अधिक्षकांच्या नावे एक पत्र पाठवले आहे. आपल्या घटकातील पोलिस अधिका-यांच्या दालनात बसवण्यात आलेल्या एअर कंडीशनर संदर्भात योग्य ती कार्यवाही करुन अर्जदार दीपककुमार गुप्ता यांना परस्पर कळवण्यासह आपल्या कार्यालयाला देखील कळवावे असे डॉ. बी.जी. शेखर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. या पत्राची प्रत जळगावसह धुळे, नगर, नाशिक ग्रामीण आदी पोलिस अधिक्षकांना देखील कळवण्यात आले आहे. आता जळगाव पोलिस अधिक्षक स्वत: आपल्या दालनातील एसी काढतील काय हे बघणे औचित्याचे ठरणार आहे. त्यानंतर इतर अ‍धिकारी एसी काढतील यात शंका नाही असे देखील म्हटले जात आहे.      

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here