जळगाव : दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांपैकी एकाला त्यांच्या त्याब्यातील मुद्देमालासह अमळनेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. अंधाराचा फायदा घेत अटकेतील संशयीत गुन्हेगाराचे इतर साथीदार फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. मात्र त्यांना लवकरच हुडकून काढले जाणार असल्याचे पो.नि. विजय शिंदे यांनी क्राईम दुनिया सोबत बोलतांना म्हटले आहे. जगदीश पुंडलीक पाटील असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.
11 एप्रिलच्या रात्री साडे तिन ते चार वाजेच्यादरम्यान अमळनेर शहरातील विजय मारोती मंदीरासमोर असलेल्या हॉटेल बलराम लगत मंगल कार्यालयाकडे जाणा-या रस्त्यावर अंधाराचा फायदा घेत दरोड्याची तयारी करणारे सहा संशयीत पोलिसांना दिसून आले. पोलिस पथक आपल्या मागावर असल्याचा सुगावा लागताच जगदीश पाटील वगळता दिनेश भोई, प्रेम पाटील, अजय अंबे रा. पिंपळकोठा ता.पारोळा, करडोणे रा. मुंबई, भटू दिलीप पाटील रा. पैलाड अमळनेर असे पाच जण पळून जाण्यात यशस्वी झाले.
पो.कॉ. जितेंद्र निकुंभे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमळनेर पोलिस स्टेशनला गु.र.न. 122 भा.द.वि. 399, शस्त्र अधिनियम 4/25, मुंबई पोलिस कायदा 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतील जगदीश पाटील याच्या ताब्यातून एक मोटार सायकल, मिरची पुड, नायलॉन दोरी, मोबाईल असा एकुण 74 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.उप निरीक्षक भैय्यासाहेब देशमुख करत आहेत. घटनास्थळाला डीवायएसपी राकेश जाधव आणि पो.नि. विजय शिंदे यांनी भेट दिली होती.