गोळीबार प्रकरणी तिघांविरुद्ध भुसावळला गुन्हा

जळगाव : भुसावळ शहरालगत साकरी ते फेकरी रेल्वे उड्डानपुलादरम्यान झालेल्या गोळीबारीच्या घटनेप्रकरणी तिघांविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण संतोष सपकाळे, संतोष शंकर सपकाळे आणि जीवन रतन सपकाळे (मुळ रा. खडके ता. भुसावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. खडका येथील रहिवासी धीरज प्रकाश सोनवणे याने भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

14 एप्रिल रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास साकरी ते फेकरी रेल्वे उड्डाण पुलादरम्यान स्विफ्ट वाहनाने अक्षय रतन सोनवणे आणि मंगेश अंबादास काळे हे जात होते. त्याचावेळी करण, संतोष आणि जीवन या तिघांनी ट्रिपल सिट मोटार सायकलने येत ओव्हरटेक करुन दोघांचे वाहन अडवले. अज्ञात कारणावरुन वाद घालत यावेळी करण संतोष सपकाळे याने त्याच्या जवळ असलेल्या पिस्टलने गोळीबार केला. त्यात अक्षय रतन सोनवणे याच्या पोटात व मंगेश अंबादास काळे याच्या छातीत गोळ्या लागून दोघे गंभीर जखमी झाले.

धीरज प्रकाश सोनवणे याने दिलेल्या फिर्यादीनुसार भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 56/23 भा.द.वि. 307, 326, 341. 34 सह आर्म अ‍ॅक्ट 3,25,27 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. प्रकाश वानखेडे करत आहेत. दोघा हल्लेखोरांच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान या घटनेने खळबळ माजली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here