मारहाणीसह उपाशी ठेवले? गळफास घेतल्याने विवाहितेचा मृत्यू

जळगाव : मारहाण, शिवीगाळ, टोचून बोलणे याशिवाय सतत उपाशी ठेवणे या प्रकारामुळे कंटाळून विवाहितेने छताला दोरीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना रावेर तालुक्यातील कुंभारखेडा या गावी उघडकीस आली आहे. या घटने प्रकरणी सावदा पोलीस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौ अरुणा मनोज कटोणे (वय 19) (रा. धामणगाव तांडे ता. मुक्ताईनगर – हल्ली रा. कुंभारखेडा तालुका रावेर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. मनोज विकास कटोणे (पती), विकास पांडुरंग कटोणे, कृष्णा विकास कटोणे आणि रीना कृष्णा कटोणे सर्व रा. कुंभारखेडा ता. रावेर अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत.

मयत अरुणा मनोज कटोणे हिचे वडील तुळशीराम बाबुराव इटावल यांनी सावदा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी अरुणा हिचे लग्न कुंभारखेडा येथील मनोज कटोणे याच्यासोबत झाले होते. सासरी नांदण्यास गेल्यानंतर तिच्या पतीसह चौघांनी लग्नात राहिलेले दीड लाख रुपये माहेरून आणावे तसेच वेळोवेळी हुंड्याच्या पैशाची मागणी करत तिला मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून टोचून बोलून उपाशी ठेवण्याचे काम करण्यात आले होते. पती मनोज याने त्याची पत्नी अरुणा तिच्याशी बोलणे बंद केले होते. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करत आहेत. या घटनेतील तिघांना अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here