जळगाव – नवीन विज मिटर कनेक्शन घेण्यासाठी अगोदर दोन हजार रुपयांची लाच घेतल्यानंतर उर्वरीत दिड हजार रुपयांची लाच घेतांना सिनीयर टेक्निशियन व लाचेची मागणी करणारा खासगी इसम अशा दोघांना जळगाव एसीबी पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी पहुर पोलिस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद उत्तम पवार असे लाच स्विकारणा-या फत्तेपूर ता. जामनेर येथील म.रा.विज मंडळाच्या सिनीयर टेक्नीशियनचे आणि कलिम सलिम तडवी असे लाचेची मागणी करणा-या खासगी इसमाचे नाव आहे. या घटनेतील तक्रारदार हे तोरनाळे ता.जामनेर येथील मुळ रहीवासी असून ते सध्या जळगाव येथे वास्तव्यास आहेत. तक्रारदारास तोरनाळे ता.जामनेर या त्यांच्या मुळगावी तोरनाळे वडीलांच्या नावे असलेल्या बखळ जागी पत्र्यांच्या शेडमध्ये विज मीटरचे नविन कनेक्शन घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी म.रा.वि.वि.कंपनी लि.फत्तेपूर कार्यालयात जावून विज मीटरचे नविन कनेक्शन मिळण्याकामी विचारपूस केली होती.
विज मंडळ कार्यालयातील सिनीयर टेक्नीशियन विनोद पवार व खाजगी इसम कलीम तडवी यांनी तक्रारदार यांना विज मीटरचे नविन कनेक्शन मिळण्यासाठी ज्यांच्या नावे कनेक्शन घ्यायचे आहे त्यांचे आधारकार्ड, ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला, शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर व डिमांडनोट, साहेबांचे व आमचे असे एकुण 3500 रुपये लागतील असे सांगितले. त्याचवेळी डिमांडनोट भरण्यासाठी तक्रारदाराकडून दोन हजार रुपये घेतले होते.
विज मीटरचे नविन कनेक्शन जोडणीसाठी दोघांनी तक्रारदाराकडे पंचासमक्ष साहेबांच्या नावाने उर्वरीत पंधराशे रुपयांची लाचेची मागणी केली. टेक्निशियन विनोद पवार याने फत्तेपूर येथील बुलढाणा ते जामनेर रोडवरील बुलढाणा अर्बन बँकेच्या शेजारील बंद दुकानाजवळ लाचेची रक्कम स्विकारताच रंगेहाथ पकडण्यात आले. दोघा आरोपीतांविरुद्ध पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिवायएसपी शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.ईश्वर धनगर, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ , पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो.कॉ.राकेश दुसाने आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.