जळगाव : रिक्षामधे विजप्रवाह उतरल्याने वेळीच प्रसंगावधान राखत रिक्षाचालकासह रस्ता वापरणा-या नागरिकांचे प्राण वाचवणा-या पोलिस कर्मचा-याचा रामेश्वर कॉलनीतील रहिवासी तथा पोलिस बॉइज अनिल सोनवणे यांनी गुलाब पुष्प देत सत्कार केला. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील उपस्थित होते.
सोमवारी सायंकाळी जळगाव शहरातील फुले मार्केट परिसरात एका रिक्षाच्या पाईपात विजेची तार अडकली होती. त्यामुळे रिक्षात विजेचा प्रवाह उतरला होता. या प्रसंगात रिक्षा चालकाला हादरा बसला होता. त्याचवेळी शनीपेठ पोलिस स्टेशनचे कर्मचारी प्रदीप नन्नवरे हे जात असतांना त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी वेळीच धाव घेत परिसरातील नागरिकांना बाजुला केले. रिक्षा चालक बंसीलाल देवराज यांना मिठ मिश्रीत पाणी पिण्यास देऊन शुद्धीवर आणले. लागलीच विज मंडळाच्या कर्मचा-यांना बोलावून विजेचा प्रवाह रोखण्यात आला. सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर पोलिस कर्मी प्रदिप नन्नवरे तेथून मार्गस्थ झाले. प्रदीप नन्नवरे यांच्या या कार्याची दखल घेत पोलिस बॉईज तथा रामेश्वर कॉलनीतील प्रसिद्ध व्यक्तीमत्व अनिल सोनवणे यांनी त्यांचा फुलांचा बुके देत सत्कार केला. यावेळी एलसीबी पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील उपस्थित होते. त्यांनी देखील प्रदीप नन्नवरे यांचे कौतुक केले.