ऑनलाईन फसवणूकीची 21 लाखांची रक्कम तक्रारदारास सुपूर्द

जळगाव : बॅंकेतून बोलत असल्याची बतावणी करत कार व बिझीनेस लोन मिळवून देण्याच्या नावाखाली 23 लाख 24 हजार 692 रुपयांचा गंडा आव्हाणे शिवारातील तरुणास घालण्यात आला होता. या घटनेप्रकरणी सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासकामी सायबर पोलिस स्टेशनचे तत्कालीन पो.नि. लिलाधर कानडे, विद्यमान पो.नि. अशोक उतेकर आणी त्यांच्या पथकाने अहोरात्र झोकून देत या गुन्ह्याचा छडा लावला आहे.

साहिल वसंतराव गाढे हा तरुण आव्हाणे शिवारातील रहीवासी असून पाळधी येथे एका खासगी कंपनीत व्यवस्थापक म्हणून कामाला आहे. सन 2020 मधे साहिल गाढे हा तरुण मालवाहू वाहन पुरवण्याचे काम करत होता. या कालावधीत त्याची ओळख त्या कंपनीतील व्यवस्थापक महेश चव्हाण याच्याशी झाली होती. जुलै 2022 मधे गाढे याने चव्हाण याच्या व्हाटस अ‍ॅप स्टेटस वर लोनची जाहीरात पाहीली होती. कार लोनची गरज असल्यामुळे साहिल गाढे या तरुणाने महेश चव्हाण यास संपर्क साधुन कागदपत्रे पाठवली होती.  

दरम्यान महेश चव्हाण याने तुझी फाईल मुंबई कार्यालयात पाठवली असल्याचे सांगितले. काही दिवसांनी पुजा चव्हाण  नावाच्या महिलेने साहिल गाढे याला फोन करुन तुमचे सिबील रेकॉर्ड खराब असल्यामुळे तुम्हाला लोन मिळणार नसल्याचे सांगितले. पुन्हा काही दिवसांनी पुजा चव्हाण  हिने साहिल गाढे याला फोन करुन संपर्क साधला. तुम्हाला लोनची आवश्यकता असल्यास सिबील रेकॉर्ड वाढवून दिला जाईल असे सांगितले. त्याकामी प्रोसेस फी, फाईल मंजूरी, ऑनलाईन जीएसटी, आयटीआर आदी कारणे सांगून गाढे याच्याकडून वेळोवेळी एकुण 23 लाख 24 हजार 692 रुपये ऑनलाईन उकळण्यात आले. तरीदेखील आपले लोन मंजुर होत नसल्याचे बघून आपली फसवणूक झाल्याची साहिल गाढे याची खात्री झाली. त्यामुळे त्याने सायबर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार भाग 5 गु.र.न. 6/23 भा.द.वि. 420, 34, आयटी अ‍ॅक्ट 66 डी नुसार 14 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचे तांत्रीक विश्लेषण करुन सायबर पोलिस स्टेशनचे तत्कालीन पो.नि. लिलाधर कानडे, विद्यमान पो.नि. अशोक उतेकर, पोलिस उप निरीक्षक दिगंबर थोरात, हे.कॉ. राजेश चौधरी, महिला पोलिस नाईक स्वाती पाटील, पोलिस नाईक दिलीप चिंचोले, सचिन सोनवणे, गौरव पाटील आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. मिरा भाईंदर जिल्हा ठाणे येथे जावून आरोपींचा शोध घेण्यात आला. दोघा आरोपींना ताब्यात घेत फसवणूकीच्या 23 लाख 24 हजार 692 एवढ्या रकमेपैकी 6 मार्चरोजी 16 लाख 60 हजार आणि 28 मार्च रोजी 5 लाख 30 हजार अशी एकुण 21 लाख 90 हजार एवढी रक्कम हस्तगत करण्यात यश मिळवले. जप्त मुद्देमाल फिर्यादीस पोलिस अधिक्षक एम राजकुमार व अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या हस्ते परत करण्यात आला आहे. यावेळी पो.नि. अशोक उतेकर व त्यांचे सहकारी हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here