जळगाव : साखरपुडा करुन लग्नाचे आमीष देत शरीरसंबंध प्रस्थापीत करुन हुंड्याची मागणी करत ठरलेला विवाह त्याने मोडला. विवाह मोडल्याने तिने दुस-या तरुणासोबत विवाह केला. त्यानंतर तिच्या पतीला फोन करुन तिची बदनामी करत तिचा झालेला विवाह त्याने मोडला. पुन्हा त्याने तिच्यासोबत लग्न करण्याचे आश्वासन दिले. लग्न मोडून संसार सोडून ती त्याच्याकडे आली. त्यानंतर त्याने दुस-याच तरुणीसोबत विवाह निश्चित केला. या कर्मकहाणीची तिने न्यायालयात दाद मागीतल्यानंतर चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला बलात्कारासह फसवणूक आणि हुंडाबळीच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव शहरातील तरुणीने न्यायालयीन दाद मागीतल्यानंतर चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला संतोष कचरु गुंजाळे (रा. अंदनेर फाटा ता. कन्नड जिल्हा छ. संभाजीनगर) या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा संतोष गुंजाळे या तरुणासोबत साखरपुडा झाला होता. साखरपुडा झाल्यानंतर संतोषने तिला लग्नाचे आश्वासन देत तिच्यासोबत शरीरसंबंध निर्माण केले. त्यानंतर लग्नासाठी एक लाख रुपयांसह मोटार सायकलची हुंडा स्वरुपात मागणी केली. या मागणीनंतर त्याने झालेला साखरपुडा व होणारे लग्न मोडले.
ठरलेले लग्न मोडल्यानंतर पिडीतेने दुस-या तरुणासोबत लग्न केले. तिच्या झालेल्या पतीला फोन करुन संतोषने तिची बदनामी करुन घटस्फोट देण्यास भाग पाडल्याचा पिडीतेचा आरोप आहे. त्यानंतर आपल्याला संतोषने पुन्हा लग्नाचे आश्वासन देत शरीर संबध केल्याचे पिडीतेचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी 3 मार्च 2022 रोजी वेरुळ येथील महादेव मंदीराच्या गाभा-यात फुलांची माळ घालून तो तिला त्याच्या घरी घेवून गेला. शरीरसंबंधानंतर पुन्हा हुंड्याची मागणी करुन तिच्यासोबत संसार न करता त्याने दुस-याच तरुणीसोबत त्याचा विवाह निश्चित केला. आपली फसवणूक झाल्याप्रकरणी तिने न्यायालयात दाद मागीतली. न्यायालयीन आदेशानुसार चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. विशाल टकले करत आहेत.