जळगाव : जळगाव जिल्ह्यातील तिघांविरुद्ध एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संदीप उर्फ डॉन मधुकर निकम (रा. गेंदालाल मिल जळगाव), वाजिद खान साबीर खान (रा. नागद रोड झोपडपट्टी चाळीसगाव) आणि शाहरुख शेख हसन (रा. इमामवाडा रावेर) अशी तिघा गुन्हेगारांची नावे आहेत.
संदीप उर्फ डॉन मधुकर निकम याच्याविरुद्ध जळगाव शहर, एमआयडीसी आणि रामानंद नगर पोलिस स्टेशनला एकुण दहा गुन्हे दाखल आहेत. याशिवाय जळगाव शहर पोलिस स्टेशनला एक अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. त्याच्याविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
वाजिद खान साबीर खान या चाळीसगाव येथील गुन्हेगाराविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला एकुण चार गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. त्याची येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे रवानगी करण्यात आली आहे. शाहरुख शेख हसन या रावेर येथील गुन्हेगाराविरुद्ध रावेर पोलिस स्टेशनला एकुण पाच गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध एक अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. त्याच्याविरुद्ध देखील वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. त्याची ठाणे मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.