जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आज दुपारी नवजात शिशूंची अदलाबदली झाल्याने गोंधळात मोठी भर पडल्याचे दिसून आले. पुरुष आणि स्त्री जातीचे दोन्ही शिशू अतीदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. दोघा बाळांची डीएनए चाचणी झाल्यानंतर त्यांना त्यांच्यामातांकडे सुपुर्द केले जाणार आहे. दरम्यान झालेल्या या अदलाबदलीमुळे शिशुंचे पालक रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त करत आहेत.
सुवर्णा सोनवणे आणि प्रतिभा भिल या दोन्ही गरोदर महिला सामान्य रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झाल्या होत्या. दोघा गरोदर महिलांची प्रसुती काही वेळेच्या अंतराने झाली. एकीला मुलगा तर दुसरीला मुलगी झाली. मात्र परिचारिकांकडून नातेवाईकांना चुकीचा निरोप दिला. त्यात अदलाबदली झाली. नंतर चुक लक्षात आल्यानंतर दोन्ही शिशू रुग्णालय प्रशासनाने ताब्यात घेतले. या प्रकारामुळे पालकांची मानसिक अवस्था बिघडली आणी गोंधळात भर पडली. तुर्त डीएनए चाचणी झाल्यानंतरच समजणार आहे की मुलगा कुणाचा आणी मुलगी कुणाची. अशा स्वरुपाच्या चुका पुन्हा घडू नये अशी सुज्ञ नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.