जळगाव : कर्जाने घेतलेल्या रकमेतून व्यवसाय सुरु केल्यानंतर बॅंकेचे व्याज आणि हफ्ते जमा न करता कर्जाची मालमत्ता परस्पर विकणा-या व्यावसायिकाविरुद्ध शिरपूर पिपल्स बॅंकेच्या वतीने अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक धुडकू पाटील असे एमआयडीसी मंगरुळ ता. अमळनेर येथील व्यावसायीकाचे नाव आहे.
शिरपूर पिपल्स बॅंकेने मंगरुळ ता. अमळनेर येथील अशोक धुडकू पाटील यांना केमिकल युनिट सुरु करण्यासाठी सन 2017 मधे 42 लाख रुपये मुदत कर्ज आणि खेळते भांडवल विस लाख कॅश क्रेडीट स्वरुपात दिले होते. या रकमेतून अशोक पाटील यांनी केमिकल युनिट साठी लागणारी मशिनरी विकत घेतली होती.
उद्योग सुरु झाल्यानंतर अशोक पाटील यांनी बॅंकेचे व्याज आणि ठरलेले हफ्ते परतफेड केले नाही उलट बॅंकेने जप्त केलेली मशिनरी परस्पर विकून टाकली. बॅंकेचे पैसे बुडवून अपहार केल्याच्या आरोपाखाली बॅंकेचे वसुली अधिकारी नरेंद्र रघुनाथ माळी यांनी अमळनेर पोलिस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. गु.र.न. 157/23 भा.द.वि. 406, 408 420 नुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक विकास शिरोळे करत आहेत.