जळगाव : दोंडाईचा येथील हॉटेल पुष्पा येथे मुख्य आचा-याचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेप्रकरणी जळगाव नजीक पाळधी येथून एकाला अटक करण्यात आली आहे. नरेश लालचंद साहू (रा. मध्यप्रदेश) असे हत्या झालेल्या मुख्य आचा-याचे तर गणेश कोळी असे पाळधी जिल्हा जळगाव येथून दोंडाईचा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. सोमवार 8 मे च्या पहाटे हा खूनाचा गुन्हा घडला आहे. हॉटेलमधील एका अल्पवयीन मुलामुळे या खूनाच्या घटनेचा उलगडा झाला.
दोंडाईचा येथील पुष्पा हॉटेल मधे काम करणारा मुख्य आचारी नरेश साहू आणि हॉटेलमध्ये काम करणारा कर्मचारी यांच्यात काहीतरी कारणावरून भांडण झाले. या भांडणाला हिंसक वळण लागून हाणामारी झाली. या हाणामारीत कर्मचाऱ्याने आचाऱ्याच्या पोटात, पाठीवर लोखंडी सुऱ्याने सपासप वार केले. या हल्ल्यात आचारी नरेश साहू हा जागीच ठार झाला.
हॉटेलच्या बाहेर बसलेल्या अल्पवयीन मुलाने या घटनेची माहिती सकाळी आठ वाजता हॉटेल मालकास दिली. हॉटेल मालकाने या घटनेची माहिती पोलिसांना कळवली. माहिती मिळताच काही वेळाने पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. शिरपूर उप विभागीय पोलिस अधिकारी अन्साराम आगरकर यांच्यासह पोलिस निरीक्षक केवलसिंग पावरा, संदीप गायकवाड, शरद लेंडे, हजारे आदींनी घटनास्थळी दाखल होत पुढील कारवाईला सुरुवात केली. घटनास्थळावरुन चाकू जप्त करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी गणेश कोळी या संशयित तरुणाला पाळधी येथून ताब्यात घेतले आहे.
हत्या झालेला आचारी नरेश साहू हा ज्याठिकाणी हॉटेलात काम करत असे त्याठिकाणी नवीन पत्त्याचे आधार कार्ड अपडेट करत असे. त्याचे चार आधार कार्ड पोलिसांना मिळून आले आहेत. त्याचे कुणी जवळचे नातेवाईक नसल्यामुळे तो हॉटेलमधेच रहात असे. घटनेच्या रात्री रविवारी रात्री साडे बारा वाजेपर्यंत हॉटेल सुरू होते. नेहमीप्रमाणे हॉटेल बंद झाल्यानंतर रात्री नरेश साहू आणि त्याच्या सोबतचे दोन कर्मचारी असे तिघे झोपण्यास गेले. नरेश साहू याच्या पोटात तसेच पाठीवर चाकूने वार करण्यात आला.