जळगाव : बोगस चिनी लोन अॅपचा वापर करुन ऑनलाईन फसवणुक करणा-या टोळीच्या दोघा मास्टर माईंडना जळगाव सायबर गुन्हे शाखेने ताब्यात घेत अटक केली आहे. प्रविण पिता गोविंदराज (अनापल्ली, अडगुडी, बेंगलुरु, कर्नाटका आणि सतिष पी (इंजीपुरा, बेंगलुरु, कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा मास्टर माईंडची नावे आहेत.
जामनेर तालुक्याच्या पहूर येथील रहिवासी असलेल्या इसमाची या घटनेत फसवणूक झाली होती. फसवनूक झालेल्या फिर्यादी यांना सुमारे 35 लोन अॅप त्यांच्या मोबाईल मधे इन्सटॉल करण्यास सांगण्यात आले होते. त्या माध्यमातून फिर्यादीच्या मोबाईलमधील सर्व डाटा मास्टर माईंडच्या ताब्यात आला होता. फिर्यादीने लोनची मागणी केली नसतांना त्यांना 6 लाख 8 हजार 785 रुपये त्यांच्या खात्यावर ऑनलाईन जमा करण्यात आले होते.
या लोनच्या रकमेची व्याजासह मागणी त्यानंतर सुरु करण्यात आली. व्याजासह रक्कम जमा केली नाही तर जीवे ठार करण्याच्या धमक्या त्यांना येत होत्या. फिर्यादीच्या मोबाईल मधील सर्व कॉन्टॅक्ट लिस्टसह फोटो व इतर माहीती मास्टर माईंड कडून चोरण्यात आली होती. मोबाईलच्या संपर्क यादीतील सर्वांना फिर्यादी व त्याच्या पत्नीबद्दल बदनामीकारक मजकूर पाठवण्यात आला होता. पैसे जमा करुन देखील बदनामीचा प्रकार सुरुच राहिल्याने फिर्यादी मानसिक दृष्ट्या खचले होते.
आत्महत्येचे विचार मनात येत असतांना फिर्यादीने सायबर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे भाग 5 गु.र.नं. 30/22 भा.द.वि. 384, 385, 386, 420, 469, 500, 501, 504, 506, 120 (ब), 34 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66, 66 (सी), 66 (ड), 67 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यातआला.
सायबर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर यांनी त्यांचे सहकारी पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या मदतीने तपास सुरु केला. फिर्यादीस आलेले व्हॉट्सअप मॅसेज, व्हॉट्सअप कॉल, फिर्यादी यांनी ज्या मोबाईल अॅपमधुन लोन त्यांचे बँक खात्यामध्ये जमा झाले होते त्याचा तपशील व फिर्यादी यांनी ज्या बँक खात्यामध्ये पैसे भरले होते त्याचा तपशील याशिवाय सर्व प्राप्त माहितीचे तांत्रिक विश्लेषन करुन पुढील तपासाला गती देण्यात आली.
या गुन्ह्यातील आरोपी बेंगलोर – कर्नाटक व तामिळनाडू राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींना अटक करण्यासह तपासकामी कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथे पो.उप.निरीक्षक दिगंबर थोरात, पोहेकॉ प्रविण वाघ, पोहेकॉ राजेश चौधरी, पोना दिलीप चिंचोले, मपोना दिप्ती अनफाट, पोकॉ दिपक सोनवणे, गौरव पाटील, अरविंद वानखेडे आदींचे पथक रवाना झाले होते. या पथकाने दोघांना अटक केली असून फसवणूक रकमेपैकी दोन लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. ती रक्कम फिर्यादीस परत देण्यात आली आहे. या गुन्ह्याचे तांत्रीक विश्लेषण पोउपनि दिगंबर थोरात, पोना दिलीप चिचोले व पोकॉ गौरव पाटील यांनी केले.