जळगाव : चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाअंती चोरटे अटक केले जातात. गुन्हा घडल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल होत असतात. मात्र गुन्हा दाखल होण्यापुर्वीच मुद्देमालासह चोरट्यांना पारोळा पोलिसांनी ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे. ताब्यातील चोरट्यांविरुद्ध रितसर गुन्हा दाखल झाला असून ते सध्या पोलिस कोठडीत कैद आहेत. पारोळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे व त्यांच्या सहका-यांच्या कौशल्याने हे साध्य झाले आहे.
पारोळा तालुक्यातील हिरापूर येथील रहिवासी बळीराम गोरख पाटील यांची म्हसवे धरणातून सिलिकॉन कंपनीची सुमारे आठ हजार रुपये किमतीची पाण्याची मोटर चोरीला गेली होती. बळीराम पाटील हे आजारी असल्यामुळे ते मोटार पाहण्यास गेले नव्हते. त्यामुळे त्यांना मोटार चोरी झाल्याचे देखील माहिती नव्हते. मात्र सागर सुभाष भिल आणि विकास अशोक सोनवणे (दोघे रा. धाबे ता पारोळा) तसेच शंकर गायकवाड (रा. पारोळा) या तिघांनी हा चोरीचा प्रकार केला असल्याची गोपनीय माहिती पो.नि. रामदास वाकोडे यांना खब-यांकडून समजली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे सागर भिल आणि विकास सोनवणे या दोघांना पो. हे. कॉ. सुधीर चौधरी, पो. कॉ. किशोर भोई, पो. कॉ. आशिष गायकवाड यांच्या पथकाने ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. सखोल चौकशीअंती दोघांनी आपला चोरीचा गुन्हा कबुल केला. या घटनेतील चोरीच्या मोटारचे मुळ मालक बळीराम पाटील यांना म्हसवे धरणावरील घटनास्थळवर बोलावण्यात आले. त्याठिकाणी त्यांची पाण्याची मोटार चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
बळीराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पारोळा पोलिस स्टेशनला पाण्याची मोटार चोरी प्रकरणी रितसर गुन्हा नोंद करण्यात आला. ताब्यातील दोघा चोरट्यांना न्यायालयात हजर करुन त्यांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली. पोलिस कोठडी दरम्यान चोरट्यांनी मुद्देमाल काढून दिला.चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आलेली पाण्याची मोटार फिर्यादी बळीराम पाटील यांनी ओळखली. आपली पाण्याची मोटार चोरी झाल्याची मुळ मालकास माहिती होण्यापुर्वी आणि गुन्हा दाखल होण्यापुर्वीच पारोळा पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. सुधीर चौधरी, पो.कॉ. किशोर भोई, पो. कॉ. आशिष गायकवाड आदिंनी या तपासकामी सहभाग घेतला.