दरोड्याच्या तयारीतील वाहनाची पोलिस वाहनास धडक – दोघांना अटक  

जळगाव : दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयीत वाहनास अडवण्याचा प्रयत्न करणा-या पोलिसांच्या अंगावर भरधाव वाहन घालून त्यांना जीवे ठार करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न समोर आला आहे. या घटनेबाबत भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेतील तिघे फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. संशयीत वाहनाने दिलेल्या धडकेत सरकारी वाहनाचे नुकसान झाले आहे.

14 मे च्या सकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास भडगाव पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले हे.कॉ. विलास पाटील आणि पो.कॉ. स्वप्नील चव्हाण असे दोघे पेट्रोलींग करत होते. यावेळी ठाणे अंमलदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे कासोदा येथून येणा-या संशयीत स्कॉर्पीओ वाहनास भडगाव शहरातील पिंपळगाव फाट्यानजीक अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र संशयीत स्कॉर्पिओ वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील गाडी न थांबवता हे.कॉ. विलास पाटील यांच्या अंगावर घालून त्यांना जीवे ठार करण्याचा प्रयत्न केला. त्यात हे.कॉ. विलास पाटील यांच्या उजव्या हाताला मार लागला. रस्त्यावरील सरकारी वाहनाला देखील संशयीत वाहनचालकाने धडक दिल्याने नुकसान झाले.

संशयीत स्कॉर्पीओ वाहनाची पाहणी केली असता त्यात वाहनाची नंबर प्लेट, मोबाईल, चाव्यांचा जुडगा, लोखंडी रॉड आणि पिवळ्या रंगाच्या दोरीचे बंडल असा संशयीत मुद्देमाल आढळून आला. खूनाचा प्रयत्न आणि सरकारी कामात अडथळा या कलमाखाली भडगाव पोलिस स्टेशनला पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोघांना अटक करण्यात आली असून त्यांचे तिन साथीदार फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. मुकेश विठ्ठल पाटील (रा. पाळधी – धरणगाव), रोशन मधुकर सोनवणे (रा. अंबिका नगर वडजाई रोड धुळे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. फयाज शेख (रा. पाळधी – धरणगाव), शशिकांत सदाशिव मोरे (रा. मोहाडी – धुळे) आणि एक अनोळखी असे तिघे फरार झाले आहेत. पोलिस उप निरीक्षक शेखर डोमाले या गुह्याचा पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here