जळगाव : सात वर्ष वयाच्या बालिकेसोबत अश्लिल कृत्य करणा-या आरोपीस एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. या घटने प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला विनयभंगासह बालकांचे लैंगिक अपराधापासून सरंक्षण अधिनियम सन 2012 चे कलम 7,8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
15 मे 2023 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सुप्रिम कॉलनी परिसरातील अल्पवयीन बालिका खेळत असतांना अचानक बेपत्ता झाली होती. तिचा शोध सुरु असतांना जवळच असलेल्या घरातून तिचा ओरडण्याचा आवाज तिच्या पालकांना आला. आवाजाच्या दिशेने सर्वांनी धाव घेतली असता पिडीत बालिकेसोबत परिसरातील रहिवासी अर्शद रब्बु पटेल हा अश्लिल कृत्य करत होता. धावून आलेल्या नातेवाईकांनी अर्शद याच्या तावडीतून तिची सुटका केली.
नातेवाईकांसह परिसरातील लोक घटनास्थळी आल्याचे बघून अर्शद पटेल हा पळून गेला. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल झाल्यानंतर पो.नि. जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले. तपास पथकातील हे.कॉ. अल्ताफ पठाण यांना समजलेल्या बातमीच्या आधारे सापळा रचून अर्शद रब्बू पटेल यास सुप्रिम कॉलनी नजीक आर.एल. चौफुली येथून ताब्यात घेत अटक करण्यात आली. तो पळून जाण्याच्या बेतात असतांनाच त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात पथकाला यश आले. परीविक्षाधिन पोलीस उप अधिक्षक आप्पासाहेब पवार तसेच पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक आनंदसिंग पाटील, म.पो.उप.निरी. रुपाली महाजन, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेका अल्ताफ पठाण, पो.कॉ राहुल रगडे, विशाल कोळी, सचिन पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.