जळगाव : पिक कर्जाचा बोझा शेतजमीनीच्या सात बारा उता-यावर लावण्यासाठी 1360 रुपयांची लाच मागणीसह ती स्विकारणा-या खासगी इसमाला जळगाव एसीबी पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे. भगवान दशरथ कुंभार असे लाच स्विकारणा-या पाचोरा तालुक्यातील बांबरुड येथील खासगी इसमाचे नाव आहे.
या घटनेत पाचोरा तालुक्यातील तक्रारदाराची त्यांच्या आईच्या नावे लासगाव शिवारात शेतजमीन आहे. या शेतजमीनीवर तक्रारदाराच्या आईच्या नावे सामनेर येथील बॅंक ऑफ़ बडोदा शाखेत पिक कर्ज मंजुर झाले आहे. या मंजुर झालेल्या पिककर्जाचा बोझा शेतजमीनीच्या सात बारा उताऱ्यावर घेण्यासाठी तक्रारदार बांबरुड तलाठी कार्यालयात गेले होते. याठिकाणी खासगी इसम भगवान कुंभार याने तक्रारदाराची भेट घेतली. आपली तलाठी अप्पांसोबत चांगले संबंध असून तुमचे काम मी करुन देतो. त्या मोबदल्यात भगवान कुंभार या खासगी इसमाने बांबरुड येथे त्यांच्या घरी पंचासमक्ष लाचेच्या रकमेचा स्विकार करताच एसीबी पथकाने त्यास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापळा पर्यवेक्षण अधिकारी तथा पोलिस उप अधिक्षक शशिकांत पाटील यांच्या अधिपत्याखाली तपास अधिकारी पोलिस निरीक्षक श्रीमती.एन.एन.जाधव, पो.नि. संजोग बच्छाव तसेच सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.ना इश्वर धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ. राकेश दुसाने, पो.कॉ.प्रणेश ठाकुर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.