यात्रेत महिलेचा विनयभंग, पतीला मारहाण

जळगाव : अमळनेर येथील संत सखाराम महाराज यात्रेत सहभागी झालेल्या महिलेचा विनयभंग आणी तिच्या पतीला मारहाणीच्या घटने प्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर येथील पैलाड भागातील रहिवासी हर्षल उर्फ पाट्या नाना पाटील आणि प्रविण उर्फ चिया प्रकाश पाटील तसेच  इतर दोघे अशा चौघांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर येथील बोरी नदी पात्रात सध्या संत सखाराम महाराजांची यात्रा सुरु आहे. 17 मे रोजी या यात्रेत एक दाम्पत्य सहभागी झाले होते. यात्रेतील पालखीत बसण्यासाठी हे दाम्पत्य तिकीट काढून रांगेत उभे होते. रांगेत अगोदरच उभे असलेल्या एका मुलाने महिलेच्या पतीला धक्का मारला. आपल्याला धक्का मारल्याचा जाब विचारणा-या महिलेच्या पतीला त्या मुलाने अश्लिल शिवीगाळ करत मारहाण देखील केली. त्यावेळी महिला तिच्या पतीचा बचाव करण्यासाठी गेली असता त्या मुलाने तिला देखील अश्लिल शिवीगाळ करत तिच्या गालावर चापट मारली.

या घटनेत महिलेच्या गळ्यातील पोत तुटून नुकसान झाले. दरम्यान दुस-या इसमाने महिलेच्या पतीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. महिलेच्या नातलगांनी या घटनेतील दोघांना ओळखले. दोघांसोबत असणा-या इतर दोघांची ओळख पटली नाही. एकुण चौघांविरुद्ध दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौजदर विलास पाटील करत आहेत.         

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here