जळगाव : जळगाव पोलिस मुख्यालयातील स्टेशन डायरी सीसीटीएनएस प्रणालीत सुरु करुन अद्यावयात करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्या, समस्या आणी तक्रारी येथील सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी केल्या आहे.या बाबतचे पत्र त्यांनी जळगाव पोलिस अधिक्षकांसह राज्याचे पोलीस महासंचालक आणि नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांना देखील पाठवले आहे.
जळगाव पोलीस मुख्यालयातील स्टेशन डायरी ऑनलाईन नसल्यामुळे पोलीस कर्मचा-यांची ड्यूटी लावतांना त्यात पारदर्शकता नसते. दिपककुमार गुप्ता यांना त्यांच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जे पोलीस कर्मचारी कर्मचारी संबंधीतास पैसे देतात त्या कर्मचा-यांना त्यांच्या सोयीनुसार सोयीच्या ठिकाणी ड्यूटी लावली जाते. काही कर्मचा-यांना प्रत्यक्ष ड्यूटी न लावता नंतर कागदोपत्री ड्युटी लावून समायोजीत केले जाते. उदाहरणार्थ एखादी आरोपी पार्टी अथवा बंदोबस्त आदी कामासाठी प्रत्यक्षात चार पोलिस कर्मचारी जातात. ते सुरक्षीतरित्या परत आल्यानंतर त्या ड्युटीमधे पैसे देणारे इतर अधिक कर्मचारी ऑफलाईन स्टेशन डायरीसह ड्युटी रजिस्टरला दाखवले जातात असा दीपककुमार गुप्ता यांचा त्यांना त्यांच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोप आहे. सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी पोलिस प्रशासनाला दिलेल्या पत्रातील काही आक्षेप तथा मुद्दे पुढील प्रमाणे आहेत.
गरजू कर्मचा-यांना रजेवर सोडण्यासाठी पैसे घेतले जातात. पैसे नाही दिले तर बंदोबस्त, कमी मनुष्यबळ अशी इतर विविध कारणे पुढे करुन रजा नाकारली जाते. चिरीमीरी केल्यानंतर लागलीच रजा मंजूर होत असल्याचे म्हटले जात असल्याचे दीपककुमार गुप्ता यांना त्यांच्या सुत्रांकडून माहिती मिळाली आहे. याशिवाय ज्या भागात बंदोबस्ताची ड्युटी असेल त्या भागातील रहिवासी कर्मचा-याला जबाबदारी न देता हेतु पुरस्सर इतर भागातील कर्मचा-याला त्या ठिकाणी ड्युटी दिली जाते. त्यानंतर ड्युटी रद्द करण्यासाठी पैशांची देवाणघेवाण केली जाते असे म्हटले जाते. उदाहरणार्थ एकाच दिवशी रावेर व चाळीसगाव येथे एखादा बंदोबस्त असल्यास धनाच्या आशेने आणि उद्देशाने चाळीसगावच्या कर्मचा-याला रावेरची ड्युटी आणि रावेरच्या कर्मचा-याला चाळीसगावची ड्युटी दिली जाते. संबंधीत त्रस्त कर्मचा-याने धनराशी दिल्यानंतर सर्वकाही सुरळीत केले जाते असे देखील समजते आणि म्हटले जाते.
याशिवाय गरज नसतांना जळगाव पोलीस स्पोर्ट अंतर्गत टेनिस ग्राउंडवर सहा आणि फुटबॉल मैदानावर चार ते सहा कर्मचारी नेमले जात असल्याचे म्हटले जाते. पाणी पिकेटसाठी आठ कर्मचारी नेमले जातात मात्र प्रत्यक्षात त्याठिकाणी एकच कर्मचारी असल्याचे देखील म्हटले जात आहे. लाईन पिकेट साठी देखील सुमारे बारा कर्मचारी नेमले जातात मात्र प्रत्यक्षात त्याठिकाणी एक अथवा दोन कर्मचारी नेमले जात असल्याचे म्हटले जाते. जिमसाठी चार कर्मचारी नेमले जात असले तरी त्याठिकाणी प्रत्यक्षात एक अथवा दोन कर्मचारी असतात असे देखील म्हटले जात आहे.
हजेरीवर अधिकाधिक कर्मचारी हजर असणे आवश्यक असताना पंधरा ते विस कर्मचारी हजर असतात असे म्हटले जात आहे. आर्थिक स्त्रोताची सेटींग लावून देणारे काही कर्मचारी रिझर्व ठेवले जातात. अशा सेटींगबाज कर्मचा-यांना जवळपासची कमी श्रमाची ड्युटी लावली जाते असा माहितीचा स्त्रोत गुप्ता यांना मिळाला आहे. बरेच कर्मचारी वर्षानुवर्ष एकाच जागी चिटकून बसले असल्याची काही कर्मचा-यांकडून अंतर्गत ओरड सुरु असल्याचे म्हटले जात आहे.
ज्या रजिस्टरमध्ये कर्मचा-यांची ड्युटी लावली जाते त्याची फोटो कॉपी त्याचवेळी (ड्युटी वाटप नंतर लगेचच) पोलीस मुख्यालयाच्या व्हाटस अॅप गृपवर टाकली जात नाही किंवा त्याची एक सत्यापित प्रत जळगाव पोलीस मुख्यालयाच्या दर्शनी भागावर लावली जात नाही. प्रत्यक्ष ड्युटी वर न जाता बहुतेक कर्मचारी त्यांच्या नातेवाईकांच्या नावे घेतलेल्या डंपरद्वारे वाळू व्यवसायात सहभागी असल्याचे देखील म्हटले जात आहे. अशा कर्मचा-यांना त्यांच्या वाळू व्यवसायासाठी पोषक वेळ आणि वातावरण मिळण्याकामी सोयीस्कर ड्युटी पैशांची देवाणघेवाण करुन लावली जात असल्याचा आरोप केला जात आहे. असे कर्मचारी मुख्यालयाची ड्युटी सोडण्यास तयार नसल्याचे देखील म्हटले जात आहे. प्रामाणीक कर्मचा-यांवर हा एकप्रकारे अन्याय असल्याचे देखील म्हटले जात आहे.
पोलिस खाते हे शिस्तीचे खाते म्हटले जाते. त्यामुळे अन्याय होत असला तरी कारवाईच्या भितीपोटी काही प्रामाणीक कर्मचारी वरिष्ठांकडे तक्रार करण्यास खुप विचार करतात. अशा प्रामाणीक कर्मचा-यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांचे बोट धरले आहे. दीपककुमार गुप्ता यांचे बोट धरुन हे प्रामाणिक पोलिस कर्मचारी आपल्याला न्याय मिळावा अशी अपेक्षा बाळगून आहेत.
कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पोलिस कर्मचारी ललित मोतीराम पाटील याच्याविरुद्ध वरिष्ठांकडे काही तक्रारी केल्या आहेत. या तक्रारी आपण केल्या नसून त्या तक्रारींवर योग्य ती कारवाई व्हावी असे दीपककुमार गुप्ता यांचे म्हणणे आहे. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने त्या तक्रारी केल्या आहेत.
या सर्व बाबी लक्षात घेता आणि त्यांचे अवलोकन केले असता सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी पोलिस प्रशासनाला विनंती केली आहे की पोलिस मुख्यालयाच्या हजेरीपटावरील कर्मचा-यांसाठी बायोमॅट्रीक थंब पद्धत सुरु करुन कामात पारदर्शकता आणावी. पोलिस मुख्यालयात सीसीटीएनएस प्रणाली सुरु करुन स्टेशन डायरी ऑनलाईन सुरु करावी. जळगाव पोलीस मुख्यालयातील ज्या रजिस्टरमध्ये कर्मचा-यांची ड्युटी लावली जाते त्याची फोटो कॉपी त्याचवेळी (ड्युटी वाटप नंतर लगेचच) पोलीस मुख्यालययाच्या व्हाटसअॅप गृपवर टाकून त्याची एक सत्यापित प्रत जळगाव पोलीस मुख्यालय दर्शनी भागावर नियमितपणे वेळेवर लावण्यात यावी. तसे संबंधिताना आदेश व्हावे. ड्युटी लावतांना पैशाविना पारदर्शक ड्युटी लावली जावी. बंदोबस्तासाठी कर्मचा-यांना सोयीचे पडेल अशा ठिकाणी त्यांची ड्युटी लावली जावी. गरज नसतांना पैशांच्या आमिषापोटी ड्युटी लावण्यात येणा-या अतिरिक्त पोलिस कर्मचा-यांच्या संखेत कपात करावी. अशा विविध मागण्या सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी जळगाव पोलिस अधिक्षकांसह राज्याचे पोलीस महासंचालक आणि नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांना केल्या आहेत.