पुणे : जेष्ठ नागरिकांच्या एटीएमचा पिन नकळत चोरुन त्यांच्या खात्यातून पैसे गायब करणारा भामटा आज पुणे पोलिसांच्या तावडीत सापडला. जेष्ठ नागरिकांना हेरुन त्यांच्या एटीएमचा पिन चोरुन पैसे गायब करण्याचे प्रकार पुणे शहर व परिसरात वाढले होते.चतु:श्रृंगी पोलिसांना संबंधीत आरोपी त्या एटीएममधे नेहमी येत असल्याचे समजले. त्यानुसार त्यांनी रखवालदारास सावध करुन त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले होते.
त्यानुसार तो भामटा अर्थात सावज एटीएम सेंटरमधे येताच रखवालदाराने बाहेरुन कुलुप लावले व चोरटा आत बंदिस्त झाला. रखवालदाराने पोलिसांना कळवताच पोलिसांनी धाव घेत त्याला ताब्यात घेतले. हा प्रकार औंधच्या डी पी रस्त्यावरील कल्पतरु इमारतीत असलेल्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरमध्ये घडला. दीपक राजेंद्र सोनी (३०) सरानी मार्ग, छतरपूर, मध्य प्रदेश असे अटकेतील भामट्याचे नाव आहे.
युनीयन बॅंक ऑफ इंडीयाच्या शाखा व्यवस्थापकांनी चतु:शृंगी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या सेंटरमधील सीसीटीव्हीच्या आधारे संशयिताचा फोटो पोलिसांनी प्राप्त केला होता. तो फोटो रखवालदाराला दाखवण्यात आला होता. त्यानुसार रखवालदाराने त्या भामट्याला ओळखले होते.