नवी दिल्ली : वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा नियोजीत वेळी व दिवशी होणार आहे. तसा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे राष्ट्रीय परीक्षा संस्था प्रवेश परीक्षा घेण्याच्या कामाला लागली आहे. एनटीएने सोमवारी रात्रीच जेईई मेन परीक्षेसाठी लागणारे प्रवेश जारी केले आहे. शनिवारपर्यंत ‘नीट’ परीक्षेसाठी लागणारे प्रवेशपत्र (अॅडमिट कार्ड) जारी केले जाणार आहेत.नीट परीक्षा १३ सप्टेंबर रोजी ऑफलाईन घेतली जाणार आहे. नीट परीक्षेसाठी १५.९७ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. ही परिक्षा देशभरात ३,८५० परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.
कोरोनाच्या साथीमुळे ही परीक्षा पुढे ढकलली होती. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेच्या आत येण्याची सुचना देण्यात आली असून पालकांनी गर्दी करु नये असे सांगण्यात आले आहे. परीक्षा केंद्रात प्रवेशापुर्वी परिक्षार्थींचे तपमान तपासले जाईल. जेईई मेन परीक्षा सहा दिवस दोन सत्रांत राहणार आहे. नीट परीक्षा एकाच दिवशी आणि एकाच वेळी आयोजित करण्यात आली आहे. जेईई मेन परीक्षा संगणकीय तर नीट परिक्षा ऑफ लाईन (पेन – पेपर) घेतली जाईल.