नाशिक : राजकीय पक्षात प्रवेश देण्यासाठी पैसे मागितल्याने एकाची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तिघांना आडगाव चौफुली परिसरातून ताब्यात घेतले आहे. यातील एक विधी संघर्षित बालक आहे. प्रविण दिवेकर असे खून झालेल्या तरुणाचे तर तुषार सिद्धार्थ पवार, चेतन दिगंबर देहाडे असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
मयत प्रविण दिवेकर आणि संशयीत तुषार पवार हे मित्र होते. पवार हा दलित पॅंथरचा पदाधिकारी आहे. मद्य पार्टी दरम्यान मनसे पक्षात प्रवेश देण्यासाठी दिवेकर याने पवार यास पंधरा हजार रुपयांची मागणी केली होती असे म्हटले जात आहे. संशयीत पवार याने त्याला नकार दिला. त्यातून झालेल्या वादातून पवार याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने दिवेकर याचा खून केला असे तपासात पुढे येत आहे. या घटनेत दिवेकर याने चाकू फेकून मारला असता पवारने तो हुकवला. त्यावेळी चेतन देहाडे आणि विधीसंघर्षित बालक अशा दोघांच्या मदतीने दिवेकरची गळा चिरुन हत्या करण्यात आली.