सोलापूर : नोकराने प्रामाणिक राहून काम केले तर त्याची नोकरी टिकून राहते. मात्र काही नोकर ज्याठिकाणी काम करतात त्या मालकाच्या पत्नी अथवा मुलीवर वाईट नजर ठेवतात. हळूहळू अशा नोकरांचे धाडस वाढत जाते. त्यांचे धाडस एवढे वाढते की ते मालकाच्या पत्नीची छेड काढायला देखील मागेपुढे बघत नाही.
सोलापूर जिल्हयाच्या बार्शी तालुक्यातील पांगरी येथे शिवाजी भिमराव बोकेफोडे हे आपल्या कुटूंबासह राहतात. त्यांच्याकडे उत्तम नारायण कांबळे हा सालदार म्हणून कामाला होता. उत्तम कांबळे याची वाईट नजर शेतमालक शिवाजी बोकेफोडे यांच्या पत्नीवर रहात होती. सालदाराची नजर चांगली नसल्याचे शेतमालक शिवाजी बोकेफोडे यांच्यासह त्यांच्या पत्नीच्या लक्षात आले होते. मात्र सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र सालदार उत्तम कांबळे याची भिड चेपली गेली होती. तो मालकाच्या मुलीची देखील छेड काढू लागला. हा प्रकार शिवाजी बोकेफोडे यांच्या मुलाच्या देखील लक्षात आला. त्यामुळे दोघे पिता पुत्र उत्तम कांबळेवर मनातून चिडले होते. सालदार उत्तम यास कायमची अद्दल घडवण्याचे बोकेफोडे पितापुत्राने मनाशी ठरवले होते.
उत्तम कांबळे हा घरी झोपला असताना शिवाजी बोकेफोडे हे त्याच्या घरी गेले. आपल्याला मासे पकडायला जायचे आहे असे सांगून ते त्याला सोबत घेवून गेले. त्याला गोड बोलून शेतातील विहीरीजवळ घेवून जात असतांना शिवाजी बोकेफोडे यांच्या समवेत त्यांचा मुलगा रवी व सहकारी राहुल माने असे दोघे जण देखील होते. पांगरी शिवारात शेतातील विहीरीजवळ येताच त्यांनी उत्तम कांबळे याचा केबलने गळा आवळून खून केला. उत्तम कांबळे याने आत्महत्या केल्याचा देखावा निर्माण करण्यासाठी त्यांनी त्याचे कपडे व बुट काढून ते विहीरीच्या काठावर ठेवले. त्यानंतर त्याचा मृतदेह विहीरीत टाकून देण्यात आला. हा सर्व प्रकार झाल्यानंतर सर्वजण तेथून पसार झाले. जणू काही झालेच नाही अशा अविर्भावात सर्व जण वावरत होते.
ज्या शेतातील विहीरीत उत्तम कांबळे याचा मृतदेह टाकून देण्यात आला होता ते शेत व विहीर जैनुद्दीन गनी शेख (रा. पांगरी ता. बार्शी) यांच्या मालकीची होती. जैनुद्दीन गनी यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी या घटनेची माहीती तात्काळ पांगरी पोलीस स्टेशनला खबर दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरु केली. विहिरीतील पाण्यावर तरंगत असलेला मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. मयत उत्तम कांबळे हा पोलिसांसह सर्वांच्या दृष्टीने अनोळखी होता.
मयताचा गळा केबल वायरने आवळलेला दिसून आला. मृताचा शर्ट, बनियन व बूट विहिरीवर ठेवलेले होते. त्यामुळे गळ्यावरील व्रण पाहता हा आत्महत्येचा देखावा असल्याचे पोलिसांच्या लक्षात येण्यास वेळ लागला नाही. मृताचे शवविच्छेदन पांगरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.माळी व डॉ.तोरड यांनी जागेवरच केले. मयताच्या हातात एक पिवळ्या रंगाच्या धाग्याची एक राखी बांधलेली होती. त्यामुळे गावामधून कुणी रक्षाबंधनानंतर बेपत्ता आहे का? याबाबत चौकशी करण्यात सुरुवात केली. त्यावेळी पिंपळगावचे पोलीस पाटील बाळासाहेब चांदने यांनी त्यांच्या गावातील उत्तम कांबळे हा रक्षाबंधनापासून बेपत्ता असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीच्या घरी जाऊन राखी, शर्ट, बूट दाखवला. त्यावेळी मयताच्या नातेवाईकांनी या वस्तू मृत उत्तम कांबळे यांच्या असल्याचे ओळखले. अशा प्रकारे मयताची ओळख पटली. मयत हा उत्तम कांबळे हा असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस उपनिरीक्षक प्रविण शिररसाठ यांनी अज्ञात आरोपी विरुद्ध सरकारतर्फे गुन्हा दाखल केला. तपासाअंती उत्तम कांबळे हा त्याच गावातील शिवाजी बोकेफोडे यांच्याकडे चार वर्षांपासून सालगडी म्हणून काम करत होता अशी माहिती मिळाली. उत्तम कांबळे व शिवाजी बोकेफोडे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता अशी माहिती पोलिस पथकाला मिळाली. घटनेच्या रात्री अकरा वाजता उत्तम कांबळे हा घरी झोपलेला असतांना शिवाजी बोकेफोडे यांनी त्यास मासे धरायचे आहेत असे सांगून सोबत नेले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांनी शेतमालक शिवाजी बोकेफोडे यांची सखोल चौकशी केली. त्यावर खरा प्रकार उघडकीस आला. उत्तम कांबळे हा पत्नी व मुलीची वारंवार छेड काढत होता. त्यामुळे शिवाजी बोकेफोडे व त्यांचा मुलगा रवी व सहकारी राहुल माने यांनी उत्तम कांबळे यास गोड बोलून मासे धरण्यास पांगरी शिवारात नेले होते. शेख यांच्या शेतामधील विहिरीजवळ आणून केबलने त्याचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर आत्महत्येचा बनाव करण्यात आला. त्याचे कपडे व बुट काढून त्याला विहीरीत ढकलून देण्यात आले. या गुन्हयाचा पुढील तपास पांगरी पोलिस स्टेशनचे स.पो.नि.सुधीर तोरडमल व त्यांचे सहकारी करत आहेत.