जळगाव : अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाच्या परिक्षा केंद्रात तक्रारदाराची पत्नी आणि इतर सात विद्यार्थ्यांना त्रास न देता परिक्षेत सहकार्य करण्याकामी लाच मागणा-या व स्विकारणा-या शिक्षकाविरुद्ध जळगाव एसीबीचे पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव यांनी अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. विजय गुलाबराव पाटील असे लाच स्विकारणा-या शिक्षकाचे नाव आहे.
पत्रकार असलेल्या तक्रारदाराची पत्नी आणि तिच्यासोबत असलेल्या इतर सात विद्यार्थ्यांना परिक्षेत कुठलाही त्रास होणार नाही यासाठी विजय पाटील या शिक्षकाने प्रत्येकी शंभर रुपये याप्रमाणे लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती हाताच्या इशा-याने 5600 रुपये मागितले. पाच हजार रुपये स्विकारल्यानंतर एसीबी सापळा पथकाने शिक्षकाला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास एसीबीचे पो.नि. एन. एन. जाधव करत आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत शिक्षक विजय पाटील यास अटक करण्यात आली नव्हती.