जळगाव : वयाची अठरा वर्ष पुर्ण झाल्यानंतर होणारे नियोजीत लग्न बदनामीची भिती घालून मोडण्यासाठी दडपण टाकणा-या तरुणाच्या त्रासाला वैतागून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याप्रकरणी जामनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधीत तरुणास अटक करण्यात आली आहे. जामनेर तालुक्यातील एका गावात गेल्या महिन्यात 12 मे रोजी ही आत्महत्येची घटना घडली होती. गोकुल सुनिल पारधी असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
या घटनेतील अल्पवयीन मुलीची वयाची अठरा वर्ष पुर्ण झाल्यानंतर नियोजीत वरासोबत लग्न होणार होते. या मुलीसोबत संशयीत गोकुल पारधी याचे प्रेमसंबंध होते असे म्हटले जात आहे. तुझ्या भावी पतीला सांगून हे लग्न करण्यास नकार दे नाहीतर मी तुझ्या भावी पतीला आपल्या प्रेमसंबंधाची माहिती देतो असे गोकुल पारधी याच्याकडून मुलीला धमकावण्याचा प्रकार सुरु होता. आपल्या पालकांची बदनामी टाळण्यासाठी मुलीने ठरलेले लग्न करण्यास नकार दिला.
त्यानंतर देखील फोटो आणि कॉल रेकॉर्डींग व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी गोकुल पारधी याच्याकडून मुलीस सुरु होती असे म्हटले जात आहे. अखेर वैतागून मुलीने गळफास घेत आत्महत्या करत आपली जीवनयात्रा गेल्या महिन्यात 12 मे रोजी केली होती. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गोकुल पारधी याच्या विरुद्ध जामनेर पोलिस स्टेशनला गु.र.न. 249/23 भा.द.वि. 306, 384 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक जयसिंग राठोड करत आहेत. संशयीतास अटक करण्यात आली आहे.