सोलापूर : जिवन जगतांना मनुष्याला आधार आवश्यक असतो. शारिरीक व मानसिक सुखाशिवाय मानवी जिवन कष्टप्रद ठरते. एकाकी जिवन वाटते तितके सोपे नसते. जिवन जगतांना साथीदाराचा आधार हा एक अविभाज्य भाग म्हटला जातो. शारीरिक व मानसिक सुख मिळाल्याशिवाय स्त्री पुरुषाला समाधान लाभत नाही. पुरुष जातीला शरीरसुखासाठी अनेक मार्ग उपलब्ध असतात. मात्र स्त्री जातीला अनेक बंधने असतात. त्यातल्या त्यात तरुण विधवा स्त्रीला आधाराची नितांत गरज असते.
सोलापूर जिल्हयातील निमगाव येथे राहणाऱ्या एका तरुण विधवा महिलेने आपल्या सुखासाठी टेंभुर्णी येथील एका तरुणाला जवळ केले होते. कालांतराने तो तिच्यावर पतीसारखा हक्क गाजवू लागला. वेळप्रसंगी तो तिला मारहाण देखील करू लागला. काळाच्या ओघात तिची मुले मोठी झाली. त्यातच तो तरुण तिला त्रास देवू लागला. त्यामुळे तिला समाजात जगणे असहय झाले. अखेर तिने आपली समस्या तिच्या भावाच्या कानावर घातली. तिच्या भावाने साथीदारांच्या मदतीने बहिणीचा प्रियकर असलेल्या तरुणाचा खून केला. पोलिसांनी या घटनेतील सर्व संशयीतांना अटक केली.
भर तारुण्यात दोन मुलांची आई असलेली करिश्मा (काल्पनिक नाव) विधवा झाली होती. ऐन तारुण्यात विधवा झालेली करिश्मा आपल्या दोघा मुलांना सोबत घेवून माहेरी सोलापूर जिल्हयाच्या माढा तालुक्यात भावाच्या घरी राहण्यास आली होती. भावाच्या घरी रहात असली तरी करिश्माचे जिवन एकाकीच होते. अशा प्रसंगात तिची गावातील सुशांत चौधरी या तरुणासोबत ओळख झाली. सुशांत चौधरी हा अविवाहीत तरुण आपल्या परिवारासह रहात होता. माहेरी आलेल्या करिश्माची सुशांतसोबत ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात होण्यास वेळ लागला नाही. विधवा आणि तरुण करिश्माला तिचे तारुण्य काही केल्या स्वस्थ बसू देत नव्हते. ती दिवसभर मोलमजुरीसाठी बाहेर जात होती. तिचा दिवस कसाही निघून जात होता. मात्र रात्र तिला बेचैन करत होती. ती एका कुशीवरुन दुस-या कुशीवर तळमळत असे. अशा वातावरणात तीची ओळख सुशांतसोबत झाली होती. त्याने तिला आपल्या जाळ्यात ओढले होते. तिची मुले अजून लहान होती व ती तरुण होती. त्यामुळे तिला सुशांतची गरज वाटत होती. सुशांतने तिला जणूकाही पत्नीप्रमाणे वागणूक देवून आपलेसे केले होते. वास्तविक दोघांचे संबंध अनैतिकतेच्या व्याखेत मोडले जात होते.
सुशांत कोणताही कामधंदा करत नसला तरी तो करिश्माला हवी असलेली गरज पुर्ण करुन देत तिला समाधानी ठेवत होता. तसेच तो तिच्या मुलांचा सांभाळ देखील करत होता. त्यामुळे तिला त्याची अडचण नव्हती. दोघे एकमेकांची गरज ओळखुन एकमेकांच्या जवळ आले होते. त्यामुळे त्यांच्या नातलगांनी देखील त्यांच्या या संबंधाला एकप्रकारे मुकसंमतीच दिली होती.
अविवाहीत असलेल्या सुशांतने तिच्यासाठी अजुन लग्न केले नव्हते. त्यामुळे गावातील लोकांना ते दोघे पती पत्नीच वाटत होते. दोघांचे ते संबंध गेल्या चार ते पाच वर्षापासून अव्याहतपणे सुरुच होते. काळ पुढे पुढे सरकत होता. आता करिश्माचा भाऊ मोठा झाला होता तसेच तिची मुले देखील मोठी झाली होती. त्यांना देखील बरेच कळायला लागले होते.
सुशांतचे करिश्मावर पतीप्रमाणे हक्क गाजवण्याचे काम सुरु झाले होते. वेळप्रसंगी दारू पिऊन आल्यावर तो तिला मारहाण देखील करत होता. त्यामुळे आता करिश्मा त्याच्या त्रासाला वैतागली होती. आता तिचा भाऊ देखील मोठा व कमावता झाला होता. त्याला आपल्या बहिणीचा त्रास बघवला जात नव्हता. त्यामुळे त्याने तिला सुशांतपासून वेगळे करत तिच्यासाठी भाड्याची वेगळी खोली घेवून दिली. या ठिकाणी करिश्मा तिच्या दोन्ही मुलांसह राहू लागली. खोली भाड्यासह इतर खर्च तिचा भाऊ करु लागला. करिश्माचा भाऊ सुशिक्षीत असल्यामुळे त्याने स्वत:चे एक कार्यालय देखील सुरु केले होते.
दरम्यानच्या काळात करिश्मा व सुशांत यांच्या संबंधाची चर्चा परिसरात सुरु झाली होती. सुशांतपासून करिश्मा वेगळी झाल्यामुळे त्याला तिची कमतरता भासत होती. तो सारखा सारखा तिच्या भावाकडे जावून करिश्माला आपल्याकडे पाठवून देण्याचा तगादा लावत होता. मी तिला आता त्रास देणार नाही व चांगली वागणूक देईल असे आश्वासन तो तिच्या भावाला देत होता. मात्र आता करिश्माची मुले मोठी झाली होती तसेच त्याच्यासोबत राहिल्याने समाजात होणारी बदनामी बघता ती त्याच्याकडे जाण्यास तयार नव्हती. दारु पिवून आल्यावर तो तिला त्रास देण्याचे थांबवत नव्हता. त्यामुळे तिने त्याच्याकडे जायचे नाही असे निश्चित केले होते. तिच्या भावाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे बघून त्याने थेट तिच्याशी संपर्क साधला. तु माझ्यासोबत रहायला ये. मी तुला यापुढे त्रास देणार नाही व तुझ्या मुलांचा सांभाळ करेन असे आश्वासन त्याने तिला देण्यास सुरुवात केली.तिच्याकडून देखील प्रतिसाद मिळत नसल्याचे बघून त्याने तिला दारु पिवून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.त्याच्या त्रासाला कंटाळून तिने हा प्रकार पुन्हा तिच्या भावाला सांगीतला.
सुशांतकडून होणारा त्रास लक्षात घेत आता काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे असा तिच्या भावाने मनाशी विचार केला. त्याने आपला मित्र सागर विष्णु जमदाडे व ज्योतीराम सावंत याना हा प्रकार सांगितला. तिघांनी मिळुन सुशांतला परत एकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले. जर त्याने ऐकलेच नाही तर शेवटचा इलाज म्हणून त्याला कायमचा धडा शिकवण्याचे ठरवले. सुशंताला कसे समजावायचे याचा विचार करिश्माचा भाऊ करत होता. त्याला काही मार्ग सापडत नव्हता. तु तुझ्या बहिणीला माझ्याकडे पाठवून दे नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकीच सुशांतने करिश्माच्या भावाला दिली होती. त्यावर यातून मार्ग काढायचा आहे असे म्हणत करिश्माच्या भावाने सुशांत यास सायंकाळी त्याच्या कार्यालयाच्या गच्चीवर बोलावून घेतले.
ठरल्यानुसार सुशांत करिश्माच्या भावाला भेटण्यासाठी त्याच्या कार्यालयात गेला. त्यावेळी सुशांत पुर्णपणे दारुच्या नशेत होता. करिश्माच्या भावाने त्याला चर्चेसाठी कार्यालयाच्या गच्चीवर नेले. चर्चेदरम्यान दोघात वाद निर्माण झाला. बघता बघता वाढत असलेला वाद शमण्याची चिन्हे दिसत नव्हती.
सुशांत दारुच्या नशेत असल्याचा फायदा घेत करिश्माच्या भावाने त्याला गच्चीवरुन खाली ढकलून दिले. तो खाली पडताच त्याच्या डोक्याला जबर मार लागला व तो बेशुध्द झाला. आता या घटनेचा बोभाटा होणार असे दिसू लागताच भितीपोटी त्याची गाळण झाली. त्याने त्याचे मित्र सागर जमदाडे व ज्योतीराम सांवत याना जागेवर बोलावून घेतले. निरोप मिळताच दोघे मित्र जागेवर हजर झाले. त्यांनी सुशांतजवळ जावून पाहिले असता त्याचा श्वास अजून सुरु होता.
तिघांनी मिळून त्याला चारचाकी वाहनात कसेबसे बसवले. तिघांनी त्याला टेंभुर्णी येथुन मचुंडी येथे आणले. करिश्माचा भाऊ कामानिमीत्त जत परिसरात येत असल्याने त्याला परिसराची चांगल्याप्रकारे माहिती होती. याकामी वापरलेले चारचाकी वाहन जत येथील एका व्यापा-याकडून आणले होते. अजूनही सुशांतचा श्वास सुरुच होता. रात्र बरीच झालेली होती. तिघांनी मुचंडी गावाच्या हद्दीत आल्यावर सुशांतला कारमधून खाली खेचले. तो खाली पडल्यावर संतापाच्या भरात करिश्माच्या भावाने त्याच्या डोक्यात जवळच पडलेला दगड घातला. तोच दगड परत दोघा मित्रांनी उचलून त्याच्या चेहऱ्यासह अंगावर घातला. त्यात सुशांतचा जागीच मृत्यू झाला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. तो खरोखर मयत झाल्याची तिघांनी खात्री केली. खात्री झाल्यानंतर त्याची ओळख पटणार नाही यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले. जवळपास झाडी झुडूपे देखील नव्हती. तो परिसर अंबाबाईचा डोंगर म्हणुन ओळखला जात होता. त्या माळरानावर त्यांनी त्याचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्यात आला. रात्रीचा अंधार आणि निर्मनुष्य वस्तीचा फायदा घेत त्याला जाळल्यानंतर तिघांनी तेथून पळ काढला. मृतदेह पुर्णपणे जळाला किंवा नाही हे देखील त्यांनी निरखून पाहिले नाही.
दुसऱ्या दिवशी तो अर्धवट जळालेला मृतदेह परिसरातील लोकांच्या दृष्टीस पडला. कुणीतरी या घटनेची माहिती गावच्या पोलिस पाटील यांच्या कानावर घातली. पोलिस पाटील यांनी लागलीच खात्री करत या घटनेची माहिती जत पोलिसांना दिली. जत पोलिसानी घटनास्थळासह मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीकामी जत येथील सरकारी रुग्णालयात रवाना केला. तपासकामी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.
तपासणी दरम्यान घटनेच्या आदल्या रात्री एक आय-२० कार संशयास्पद रितीने धावतांना आढळून आली. पोलिसांनी त्या फुटेजच्या आधारे त्या कार मालकाचा शोध घेतला. त्या मालकाकडे चौकशी केली असता ती कार टेंभुर्णी गावातील तरुणाने अर्थात करिश्माच्या भावाने नेली असल्याचे उघडकीस आले. त्या आधारे पोलीसांनी करिश्माच्या भावाला ताब्यात घेत चौकशीचा फास त्याच्याभोवती आवळला. पोलिसी खाक्या बघून त्याने व सोबतच्या मित्रांनी आपला गुन्हा कबुल केला. अशा प्रकारे सर्व घटनाक्रम समोर आला व खूनाचा उलगडा झाला.
मयत सुशांत नागनाथ चौधरी (वय २८ रा.निमगाव ता.माढा.जिल्हा सोलापुर) हा असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा खून करुन पुरावा नष्ट केल्या प्रकरणी पोलीसांनी करिश्माच्या भावासह त्याचे मित्र सागर जमदाडे (वय ३०) आणि ज्योतीराम सांवत (वय २९) या टेंभुर्णी येथील दोघा तरुणांना ताब्यात घेत अटक केली. तिघांविरुद्ध जत पोलिसात भा.द.वि. ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. तिघांना अटक करुन न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. गुन्हयात वापरलेली आय-२० कार पोलिसांनी जप्त केली. सदर घटनेचा तपास वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पुर्ण केला.