जळगाव : पहुर पोलिस स्टेशनला दाखल मिसींग मधील व्यक्तीचा खून झाल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले असून मारेक-यास अटक करण्यात आली आहे. रमेश संपत मोरे असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे तर कैलास विठोबा वडाळे (रा. जांभुळ ता. जामनेर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. मयत आणि संशयीत असे दोघे मित्र होते. आर्थिक वादातून दारुच्या नशेत हा खून झाल्याचे म्हटले जात आहे.
जांभुळ ता. जामनेर येथील कैलास विठोबा वडाळे हा 13 मे 2023 रोजी घरी परत आला नव्हता. त्यामुळे त्याच्या घरातील सदस्य हैरान झाले होते. त्याचा शोध सुरु होता. मात्र कुठेही शोध न लागल्याने तो हरवल्याची पहुर पोलिस स्टेशनला दुस-या दिवशी 14 मे 2023 रोजी 16/23 या क्रमांकाने मिसींग दाखल करण्यात आली होती. दरम्यान एक महिन्याचा कालावधी उलटला तरी देखील कैलास वडाळे याचा शोध लागत नव्हता. त्यामुळे हवालदिल झालेले त्याचे नातेवाईक थेट पोलिस अधिक्षकांना जावून भेटले होते. पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांनी या गुन्ह्याच्या पुढील तपासाच्या सुचना पहुर पोलिस स्टेशनचे पो.नि. प्रताप इंगळे यांना दिल्या होत्या. तसेच या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील व त्यांचे सहकारी करत होते. बेपत्ता कैलास वडाळे याचा घातपात झाला असल्याची चर्चा यानिमीत्ताने परिसरात सुरु झाली होती.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक गणेश वाघमारे, हे.कॉ. विजयसिंग पाटील, हे.कॉ. सुधाकर अंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, विजय पाटील, प्रितम पाटील, संदिप सावळे, लक्ष्मण पाटील, हेमंत पाटील, नितीन बावीस्कर, रणजीत जाधव, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, दर्शन ढाकणे, ईश्वर पाटील याशिवाय पोलिस मुख्यालयातील सहायक फौजदार अशोक महाजन, हे.कॉ. भरत पाटील, प्रमोद ठाकुर आदींचे पथक तयार करण्यात आले.
बेपत्ता कैलास वडाळे याच्यासोबत कोणकोण होते? त्याला शेवटचे कुणी पाहिले याचा शोध घेतला असता त्याचा मित्र रमेश संपत मोरे याचे नाव समोर आले. स्थानिक गुन्हे शाखेने आज अकरा वाजेच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले. गेल्या कित्येक दिवसांपासून तो आपला गुन्हा कबुल करत नव्हता. त्याची दिवसभर चौकशी सुरु होती. दरम्यान अधिक चौकशीकामी त्याचा जावई, मुलगी आणि मुलगा यांना देखील चौकशीकामी बोलावण्याचे निश्चीत करण्यात आले. आपला जावई, आपली मुलगी आणि मुलगा यांना बोलावले असल्याचे समजल्यानंतर रमेश मोरे याच्या अंगातील दृश्यम चित्रपटातील भुत नाहीसे झाले आणि तो भानावर येत त्याने आपला गुन्हा कबुल केला. माझ्या जावयाला आणि मुलीला बोलावू नका, बेपत्ता कैलास वडाळे याचा खून मीच केला असल्याचे रमेश मोरे याने कबुल केले.
बेपत्ता आणि मयत कैलास वडाळे याने त्याचा मित्र तथा संशयीत आरोपी रमेश मोरे याला विस हजार रुपये दिले होते. त्या रकमेवरुन दोघांमधे दारु पितांना वाद झाले होते. त्या वादातून शिवीगाळ व नंतर खूनाची घटना घडली. या घटनेतील मयताचे बुट, शर्ट, मोबाईल आढळून आले आहेत. मृतदेहाचा शोध सुरु आहे. त्याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत रमेश मोरे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 27 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याला पहुर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पो.नि. प्रताप इंगळे व त्यांचे सहकारी करत आहेत.