शंख विकत देण्याच्या बहाण्याने बोलावून हिसकावला लाखोंचा ऐवज

On: June 24, 2023 9:48 AM

जळगाव : शंख विकत देण्याच्या बहाण्याने नांदेड येथील दुकानदारास मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथे एका खोलीत बोलावून दहा ते बारा जणांनी मारहाण करत रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज हिसकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटने प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

बसवराज हनुमंतराव बिराजदार हे नांदेड येथील जनरल स्टोअर चालक आहेत. त्यांना हलखेडा येथील संतोष अजबराव पाटील व इतरांनी शंख विकत घेण्यासाठी बोलावले होते. शंख विकत घेण्याच्या उद्देशाने आलेल्या बसवराज बिराजदार यांना संतोष अजबराव पाटील, गणेश पवार, मुक्त्यार भाई व रणजीत पवार यांच्यासह दहा ते बारा जणांनी एका खोलीत नेत मारहाण केली. 22 जून रोजी हा प्रकार घडल्यानंतर 23 जून रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत बसवराज बिराजदार यांना एका खोलीत डांबून त्यांच्या चारचाकी गाडीतील रोख रक्कम 4 लाख 38 हजार, दिड लाख रुपये किमतीचा फोल्ड मोबाईल, 15 हजार रुपये किमतीचा लावा कंपनीचा मोबाईल, 12 हजार रुपये किमतीचा सॅंमसंग कंपनीचा मोबाईल, एक लाख रुपये किमतीचा आयफोन, 30 हजार रुपये किमतीचा वन प्लस कंपनीचा मोबाईल, 25 हजार रुपये किमतीची पुष्कराज खड्याची 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, आधार कार्ड, पॅन कार्ड, क्रेडीट कार्ड असा एकुण 7 लाख 70 हजार रुपये किमतीचा ऐवज हिसकावण्यात आला. पोलिसात तक्रार केल्यास या घटनेची शुटींग व्हायरल करु अशी बिराजदार यांना धमकी देण्यात आली होती. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप दुनगहू करत आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment