खूनाच्या गुन्ह्यातील संशयीतासोबत भ्रमण करणारा महसुल अधिकारी पोलिसांच्या ताब्यात

जळगाव : खूनाच्या गुन्ह्यात संशयीत आरोपीसोबत भ्रमण करणारा महसुल अधिकारी पोलिसांच्या ताब्यात आला आहे. या महसुल अधिका-यासोबत मुख्य संशयीत आरोपीस देखील ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना धरणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या घटनेमुळे स्थानिक महसुल प्रशासनात खळबळ माजली आहे.

गेल्या 23 जून 2023 रोजी गिरणा नदी पात्रात बांभोरी शिवारात बाळा उर्फ आशिष प्रकाश शिरसाळे या बावीस वर्षाच्या तरुणाचा लोखंडी हत्याराने हल्ला करुन खून करण्यात आला होता. या घटने प्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला 24 जून 2023 रोजी भल्या पहाटे सव्वा तिन वाजता प्रकाश आनंदा शिरसाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञाताविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाग 5 गु.र.न. 204/23 भा.द.वि. 302 नुसार दाखल गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील व त्यांच्य सहकरी करत होते.

या घटनेला महिलेच्या संबंधाची किनार लाभली असून त्यातून हा खून झाला असल्याचे तपासात पुढे झाले आहे. या घटनेच्या तांत्रीक तपासादरम्यान छोटू उर्फ प्रमोद भिमराव नन्नवरे हा संशयीत आरोपी असल्याचे दिसून आले. फरार छोटु उर्फ प्रमोद नन्नवरे याच्यासोबत महसुल विभागाचा मंडल अधिकारी अमोल विक्रम पाटील हा देखील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आपण एका संशयीतासोबत भ्रमंती करत असल्याचे समजल्यानंतर देखील मंडल अधिकारी अमोल विक्रम पाटील याने पोलिस प्रशासनास सहकार्य न करता तसेच माघारी न येता पुढील प्रवास केल्याचे समजते. अखेर दोघांना उस्मानाबाद येथून ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपासकामी धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्यासह त्यांच्या पथकातील हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, लक्ष्मण पाटील, विजय पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, महेश सोमवंशी, अशोक पाटील आदीनी सहभाग घेतला.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here