जळगाव : वाळू व्यावसायीक तथा खूनाच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपीसोबत संगत मंडळ अधिकारी अमोल विक्रम पाटील (अप्पा) याच्या अंगाशी आली आहे. खूनाच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपीसोबत भ्रमंती केल्याने अप्पाला देखील पोलिसांच्या स्वाधीन होण्याची वेळ आली आहे. वाळू व्यावसायीकांसोबत महसुल अधिका-याची दोस्ती या घटनेच्या निमीत्ताने उघड झाली आहे. वाळू व्यावसायीकासोबत संगत आणि पंगत कशी महागात पडते याची या निमीत्ताने आता चर्चा होऊ लागली आहे.
आशिष उर्फ बाळा प्रकाश शिरसाळे या बांभोरी येथील तरुणाची एका महिलेसोबत असलेली प्रेमसंबंधाची किनार लक्षात घेत त्याची हत्या झाल्याचे म्हटले जात आहे. या खून प्रकरणी संशयीत छोटू उर्फ प्रमोद भिमराव नन्नवरे हा घटनेनंतर पाळधी येथील एका हॉटेलवर मद्यप्राशन करण्यास गेला होता. त्याठिकाणी त्याला महसुल अधिकारी अमोल पाटील (अप्पा) भेटला. गप्पाटप्पा केल्यानंतर दोघांनी देवदर्शनाच्या निमीत्ताने दोघे कारने मराठवाड्याच्या दिशेने प्रवास सुरु केला.
तपासादरम्यान अमोल पाटील (अप्पा) संशयीत प्रमोद नन्नवरे याच्या सोबत असल्याचे पोलिस प्रशासनाच्या लक्षात आले. अप्पा यास खूनाच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी आपल्यासोबत असल्याचे निदर्शनास आणून देखील मंडळ अधिकारी अमोल पाटील (अप्पा) परतीच्या प्रवासाला न लागता पुढे पुढे प्रवास करत राहिला. वाटेत तुळजापूर तालुक्यातील जळकोट गावानजीक त्यांच्या वाहनाने एका दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य जखमी झाले. या कालावधीत दोघे स्थानिक पोलिसांच्या मदतीने जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागले.