लवंगी मिरच्या चांगल्याच झोंबल्या! टाळकी फिरली?

महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदेशाहीच्या वर्षपूर्तीच्या पंधरवाड्या आधीपासूनच अत्यंत तिखट लवंगी मिरच्या विरोधकांच्या नाकाला कशा झोंबतील अशा पद्धतीचे “मिरचीचा झटका” प्रयोग सुरु आहेत. भाजपाचे अत्यंत धुरंधर नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना उद्देशून उनको मिर्ची लगी तो मैं क्या करु म्हणत टोला हाणला. सन 2014 पासून राज्यात भाजपा शिवसेनेची गाजलेली भांडणे आपण पाहिली.आताही तेच सुरु दिसते. थीम तीच – मिरच्यांची धुरी. फक्त पात्रे बदलतात. आधी फडणवीस –  उद्धव ठाकरे लढले. ठाकरे यांची शिवसेना फोडून एकनाथ शिंदे – ठाकरे अशी नवी झुंज  लावली गेली. हे करताना शिंदे विरुद्ध फडणवीस असाही डाव टाकला गेला. फडणवीसांच्या ब-यापैकी नव्हे चांगलाच पाणउतारा करुन शिंदे – फडणवीसांना महाविकास आघाडीच्या झुंजीत उतरवले. हे करून झाल्यावर मिशन मुंबई महापालिका, राज्य विधानसभा 200 जागा, मिशन लोकसभा 45 जागा ही टार्गेट्स कोण पूर्ण करणार? उद्धव ठाकरेंशी कोणी पंगा घेणार? शरद पवारांशी कोणी पंगा घेणार? काँग्रेसला कोण भिडणार? काँग्रेसची व्होट बँक भाजपाशी भिडण्यासाठी ऐक्याची मोट बांधणारी महाराष्ट्राची महाविकास आघाडी साकारणारे शरद पवार आणि पाटण्यात एकत्र आलेले 19 विरोधी पक्षनेते यामुळे खरे तर दिल्लीची अस्वस्थता वाढली.

परदेशातून परतताच  पंतप्रधान मोदीजी यांनी आल्या आल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी सन 2012 नंतरचा महाराष्ट्रातील 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा आता पुन्हा सन 2023 मध्ये बाहेर काढला. पाटण्यात जमलेल्या विरोधकांच्या कथित घोटाळ्याची 20 लाख कोटींची यादी जनतेसमोर धरली. त्यांचा जोरदार आवेश बघून आताच निवडणुका घोषित झाल्या की काय असा भास झाला. असे अनेक मुख्यमंत्र्यांच्या राजवटीत अनेक मंत्री मुख्यमंत्र्यांच्या कानापेक्षा उंच उडी मारतात असे दिसले. फडणवीस सत्तेत असताना मुख्यमंत्र्यांना फाईल न देताच ते दाखवल्याचा शेरा मारणारे मंत्री प्रकाश मेहता,चिक्की 6 हजार कोटी, खडसेंची 12 खाती – जमीन प्रकरण, मास्तराच्या मुलाची 1200 कोटींची संपत्ती, चिट फंड घोटाळे, पतपेढ्या, मल्टीस्टेट पतसंस्थांमधील 30 ते 50 हजार कोटींचे घोटाळे – त्यांना अभय देणारे मंत्री, भ्रष्टाचारी आपले मित्र असल्याची कबुली देणारे मंत्री यांच्यापैकी एकही फासावर लटकलेला जनतेला दिसला नाही किंवा सक्तमजुरी म्हणून खडी फोडत बसला असे चित्र दिसले नाही. स्वतःची घरेदारे शेतीवाडी इस्टेटी विकून कुण्या मंत्र्याने स्वतःच्या प्रसिद्धीचे स्तोम माजवल्याचे चित्र नाही.

निवृत्त पोलीस महासंचालक जे. एफ. रिबेरो म्हणतात त्याप्रमाणे जनतेच्या करातून जमा होणारी पैशाची उधळपट्टी केली जाते. ज्यांच्यावर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप आजही करतात त्यांनाच उपमुख्यमंत्री करुन पहाटेचा शपथविधी घडवणा-या मुख्यमंत्री, राज्यपाल यांना जाब विचारुन तुरुंगात डांबण्याऐवजी आताही त्याच पहाटेच्या शपथविधीचे भूत नाचवले जाते. मोदीजी यांनी 70 हजाराच्या सिंचन घोटाळ्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसवर हल्ला करताच  महाराष्ट्राचा रायगढ शांत बसला आणि फडणवीसांना जाग आली. राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांच्या सहमतीने पहाटेचा शपथविधी झाल्याची नवी थिअरी गौप्यस्फोट म्हणून ते सांगत आहेत. जाहिरातीद्वारे स्वतःची मर्दुमकी गाजवणारे शिंदे हे चुकले,  जाहिरात दिल्याची चुक त्यांनी मान्य केली असे सांगून शिंदे यांनी दिलेली जाहिरात दिशाभूल करणारी होती असे फडणवीस सांगत आहेत. राजकारण्यांच्या फसव्या जाहिराती, दिशाभूल करणारी विधाने कोलांटउड्या यामुळे नेमका कुणावर विश्वास ठेवावा हा जनतेला पडलेला प्रश्न आहे. शिंदे यांच्या शिवसेनेच्या शिडातली हवा काढण्यासाठी फडणवीसांनी सन 2024 नंतर राज्याच्या पुढचा मुख्यमंत्री पक्षाचे संसदीय बोर्ड ठरवणार? असा नवा दणका दिला आहे. भाजपाला लोकसभेच्या कथित 45 ते 48 जागा हव्या तर शिंदे गटाला 17 जागा देण्यापेक्षा भाजपात शामिल करण्याचा दणका आवश्यक. त्यासाठी राष्ट्रपती राजवटीचा डोस ठरलेला दिसतो.

दिल्लीस महाराष्ट्राची चिंता किती यापेक्षा लोकसभा 300 जागा – केंद्राची सत्ता महत्त्वाची. त्यासाठी फडणवीसही चालणार. महाविकास आघाडी फोडण्यासाठी ठाकरेही जवळ घेतले जाऊ शकतात. सगळ्यांना सत्तेच्या पंढरपुराचा विठोबा व्हायचे आहे. ही राजकीय सत्ता पंढरीची दिंडी आहे. आषाढी एकादशीला पंढरपुरात पायी दिंडीत जाऊन विठोबाला भजणारे भक्त वेगळे आणि महाराष्ट्राचा बळीराजा सुखी ठेव म्हणणारे मुख्यमंत्री सन 1960 पासून महाराष्ट्र पहात आला आहे. खरतर विठोबानेच हे सगळं करायचं तर राजकारण्याच्या दिंड्या कशासाठी?

दुसरी अशीच एक बातमी. शिंदेशाहीचे मंत्री केसरकर म्हणाले शिंदे यांचा “उठाव” आणि शरद पवारांची “पुलोद” दोन्ही सारखेच. माननीय केसकरजी मंत्री आहेत. अत्यंत विद्वान म्हटले जातात. इथे आम्हास रा.कॉ.ची बाजू घेणे किंवा वकीली करणे नाही पण एक नागरिक म्हणून आठवण द्यावीशी वाटते तेव्हा शरद पवार हे समर्थक आमदारांचा जथ्था सोबत घेऊन सूरत, गुवाहाटी, गोवा पर्यटनाला विमानाने पळाले नव्हते. त्यावेळी 50 खोके – ओके ओके असा प्रकार नव्हता. तेव्हाच्या जनसंघाचे उत्तमराव पाटील यांना काँग्रेसच्या ऑफर होत्या. पण जनसंघाच्या विचारधारेतील तत्कालीन नेते मंडळी सोन्याच्या डोंगराला लाथ मारण्याच्या क्षमतेची होती. निष्ठेचा राजकारणाऐवजी आज मॅजिक नंबर गेम आल्याने विद्वानांची विधाने ही यांची टाळकी फिरली काय? या दादा कोंडकेंच्या ग्रामीण प्रश्नाला जन्म देतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here