बेपत्ता तरुणाचा खून उघडकीस – एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

जळगाव : नशिराबाद पोलिस स्टेशन हद्दीतील बेपत्ता तरुणाचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. नशिराबाद पोलिस स्टेशनला दाखल मिसींग मधील तरुणाचा एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत खून झाल्याचे उघड झाले आहे. राहुल उर्फ गोलू युवराज भिल असे खून झालेल्या मयत तरुणाचे नाव आहे. जयराम धोंडू कोळी आणि भुषण उर्फ भुरा पाटील (रा. वराडसिम) असे या गुन्ह्यातील दोघा संशयीत आरोपींची नावे आहेत. यापैकी जयराम धोंडू कोळी हा नशिराबाद पोलिस स्टेशनला दाखल एका गुन्ह्यात यापुर्वीच अटकेत आहेत. भुषण पाटील यास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली असून त्याला पुढील तपासकामी नशिराबाद पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

2 जुलै 2023 रोजी राहुल उर्फ गोलू युवराज भिल हा तरुण जळगाव तालुक्यातील कंडारी येथून सकाळी दहा वाजेच्या सुमारास घराबाहेर गेला होता. त्यानंतर तो घरी परत आलाच नाही. त्यामुळे त्याचे वडील युवराज भिल यांनी त्याचा शोध  सुरु केला होता. 6 जुलै रोजी नशिराबाद पोलिस स्टेशनला तो हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मिसींग दाखल केल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास राहुलचा मृतदेह जळगाव शिवारातील रायपुर  परिसरातील पाटचारीजवळ संशयास्पदरित्या मिळुन आले होते. याबाबत एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. संशयास्पद अवस्थेत मृतदेह मिळून आल्याने त्याचा कुणीतरी खून केल्याचे दिसून येत होते.त्या दृष्टीने एमआयडीसी पोलिसांच्या शोध पथकाने पुढील तपासाला सुरुवात केली.

तपासादरम्यान 2 जुलै 2023 रोजी मयत राहुल उर्फ गोलु हा गावातील राहणारा जयराम धोंडु कोळी व बादल परदेशी या दोघांसोबत दिवसभर मद्यपान करत होता अशी माहिती एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली.  तसेच जयराम धोंडू कोळी याचा राहुल उर्फ गोलू याच्याशी वाद झाला होता अशी अधिकची माहिती देखील तपासात पुढे आली.

या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले होते. हाणामारीच्या ठिकाणी जयराम धोंडू कोळी याचा मित्र भूषण उर्फ भुरा पाटील (रा. वराडसिम ता. भुसावळ जि. जळगाव) हा देखील आल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे भुषण पाटील यास वराडसीम येथून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. भुषण पाटील याने आपला गुन्हा कबुल केला असून त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुल भिल याच्या खूनाचा घटनाक्रम समोर आला आहे. 2 जुलै रोजी रात्रीच्या वेळी साडे आठ वाजेच्या सुमारास कंडारी गावातून राहुल यास मोटार सायकलने नेण्यात आले. मोटार सायकल जयराम कोळी हा चालवत होता. मध्यभागी मयत राहुल आणि शेवटी भुषण पाटील ट्रिपल सिट बसला होता. जयराम याच्यासोबत राहुल याने भांडण केले होते. त्या भांडणाचा राग जयरामच्या मनात होता. त्या रागातून त्याला मारहाण झाली होती. त्या मारहाणीत राहुल हा जागीच मरण पावला होता. त्याची ओळख पटू नये यासाठी त्याचा मृतदेह पाटचारीच्या खाली दोन्ही बाजूने दगड लावून पाईपात लपवून देण्यात आला.

जयराम याने राहुलच्या अंगावरील कपडे काढून ते कुठेतरी फेकुन दिल्याचे जयरामने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी राहुलचे वडील युवराज दलपत भिल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा नशिराबाद पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे. अकस्मात मृत्यूच्या नोंदीवरुन एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. जयपाल हिरे यांच्या पथकातील गुन्हे शोध पथकाने या खूनाचा उलगडा केला आहे. या तपासकामी पो.नि. जयपाल हिरे यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख, पोलीस उपनिरीक्षक रविद्र गिरासे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सचिन मुंढे, रामकृष्ण पाटील, किशोर पाटील, ईमान सैय्यद, तुषार गिरासे, सुधीर साळवे, गोविंदा पाटील, मुदस्सर काझी, सचिन पाटील,साईनाथ मुंढे, पोलीस चालक ईम्तियाज खान, चालक मनोज पाटील, जगदिश भोई आदींनी सहभाग घेतला. घटनास्थळावर कुठलाही पुरावा नसतांना हा गुन्हा एमआयडीसी पोलिसांनी सलग तिन दिवस कंडारी गावात जावून, माहिती काढून हा खूनाचा गुन्हा उघडकीस आणला. पुढील तपास नशिराबाद पोलिस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here