जळगाव : वाढलेला वाद थांबवण्यासाह जमलेला जमाव पांगवण्यासाठी एकाने हवेत गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. जळगाव शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरात भर दिवसा घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. दीपक बागूल असे जळगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
शिवाजीनगर हुडको परिसरात आज दुपारी एक वाजेच्या सुमारास पूर्व वैमनस्स्यातून वाद सुरू होता. हा वाद बघता बघता चिघळत गेला. त्यामुळे साहजिकच गर्दी वाढत गेली. याच कालावधीत एकाने आपल्या ताब्यातील कट्टयाने हवेत गोळीबार केला. गोळीबार होताच जमलेली गर्दी निवळली. मात्र गोळीबार करणा-याकडे हे पिस्टल आले कुठून हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. गावठी कट्ट्याविरुध्द वेळोवेळी कारवाई होत असतांना देखील कट्टे बाळगणारे तरुण वावरत असल्याचे या घटनेच्या निमित्ताने पुढे आले आहे. दरम्यान ताब्यातील संशयित हा एका गुन्ह्यात जामीनावर सुटून बाहेर आला असल्याचे म्हटले जात आहे. शेवटचे वृत्त आले तेव्हा त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला नव्हता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेकॉ. विजयसिंह पाटील, हेकॉ. सुधाकर अंभोरे, हेकॉ. अकरम शेख, हेकॉ. महेश महाजन, हेकॉ. जितू पाटील, पोना. विजय पाटील, पोना. प्रीतम पाटील यांच्या पथकाने गुन्हा घडताच संशयिताला ताब्यात घेतले.