सरदार अॅग्रो फर्टिलायझर राज्य परवाना निलंबित

On: July 25, 2023 12:22 PM

जळगाव :  गुजरात मोरबी येथील सरदार अॅग्रो फर्टिलायझर या कंपनीचे सिंगल सुपर फॉस्फेट खत वापरामुळे जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ६२८ शेतकऱ्यांचे ९९७.२० हेक्टर बाधीत झाल्यामुळे या कंपनीचा राज्य परवाना निलंबित करण्यात आला आहे. या सोबत जिल्ह्यातील एक घाऊक व ४ किरकोळ विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. विक्रेत्यांकडे असलेल्या ४५१ टन खत साठा विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. अशी माहिती नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी दिली आहे.

सरदार ॲग्रो फर्टिलायझर कंपनीचे जबाबदार व्यक्ती व संबधीत ४ खत विक्रेत्यांवर जामनेर पोलीस स्टेशन येथे कृषी विभागामार्फत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बोगस खतामुळे बाधीत झालेल्या शेतांचे पंचनामे पूर्ण करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून त्यांना भरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयामार्फत शासनास सादर करण्यात येत आहे. जिल्हाभरात गुणनियंत्रण निरीक्षकांमार्फत २९ नमुने तपासणीसाठी घेण्यात आलेले असून त्यापैकी ९ नमुने तपासणीत अप्रमाणित आढळून आले आहेत. अप्रमाणित खत व बियाणे विक्रीतून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचे प्रकार घडत असतात. यामुळे नुकसान देखील सहन करावे लागत असते. दरम्यान कृषी विभागाने फसवणुकीचे प्रकार घडू नये म्हणून विशेष लक्ष ठेवले असून, शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास कृषी केंद्र चालकांचे परवाने रद्द केले जाणार आहेत.

खरीप हंगाम २०२३ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्राकडून खते, बियाणे व किटकनाशकांची खरेदी करावी. खरेदी करतांना पक्के बिल घ्यावे. जिल्हयात विनापरवाना निविष्ठांची विक्री कोणी करत असेल तर कृषी विभागाच्या भ्रमणध्वनी क्रमांक ९८२२४४६६५५ व दुरध्वनी क्र. ०२५७-२२३९०५४ वर माहिती द्यावी. बनावट बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके यांची विक्री तथा जादा दराने कृषी निविष्ठांची विक्री करीत असल्यास किंवा कोणत्याही विक्रेत्याने शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास अशांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशारा ही श्री.वाघ यांनी दिला आहे. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment