जळगाव : ताब्यातील शस्त्राचे प्रदर्शन करुन जनतेत दहशत निर्माण करणे, पर्यायाने शस्त्राचा गैरवापर होत असल्याचे दिसून येत असल्यामुळे दोघांचा शस्त्र परवाना रद्द होण्यासाठी करण्यात आलेल्या तक्रार अर्जावर कार्यवाही सुरु झाली आहे. जळगाव शहरातील शस्त्र परवानाधारक आयुष मणीयार आणि पियुष मनियार ( दोघे रा. गणेशवाडी पंचमुखी हनुमान मंदिराजवळ जळगाव) या दोघांविरुद्ध शस्त्र परवान्याचा गैरवापर होत असल्याची तक्रार सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती.
दीपककुमार गुप्ता यांच्या या तक्रार अर्जाची जिल्हाधीकारी कार्यालयाने दखल घेतली आहे. नायब तहसीलदार (गृह) प्रदीप झांबरे यांच्या सहीचे याप्रकरणी चौकशी होण्याबाबतचे पत्र जळगाव पोलिस अधिक्षकांना देण्यात आले आहे. एकाच घरात दोघांना देण्यात आलेला शस्त्र परवाना स्थानिक राजकीय दडपणाखाली तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या कार्यकाळात दिला गेल्याचे म्हटले जात आहे. एकाच घरात दोघांना देण्यात आलेला शस्त्र परवाना अनावश्यक असल्याचे देखील म्हटले जात आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या कार्यकाळात राजकीय दडपणाखाली प्रत्येकी चार ते पाच लाख रुपये घेवून शस्त्र परवाने वितरित झाले असल्याची चर्चा त्यावेळी होती. त्या आधारे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. 9 जून 2023 रोजी डीजीपी (लाच लुचपत प्रतिबंधक विभाग) कार्यालयाने नाशिक पोलिस अधीक्षक (लाच लुचपत प्रतिबंधक विभाग) यांच्याकडे मेल द्वारे गुप्ता यांच्या तक्रार अर्जावर कारवाई करण्याबाबत मेल केला आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या कार्यकाळात साधारण आठ ते नऊ महिन्यात सर्वाधिक शस्त्र परवान्यांचे वितरण झाले असल्याचे म्हटले जात आहे. ज्यांना शस्त्र परवान्याची गरज नाही अशा व्यक्तींना शस्त्र परवाना दिल्याने जनतेच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे या निमित्ताने म्हटले जात आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या कार्यकाळात आर्थिक गैर व्यवहार करण्याकामी मोठ्या प्रमाणात दलाल सक्रिय झाले होते असे आजही म्हटले जात आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या कार्यकाळात पाळधी येथील एकाला देखील शस्त्र परवाना दिला गेल्याचे म्हटले जात आहे. हा इसम रेशन संबंधीत असल्याचे म्हटले जात आहे. एका राजकीय पुढा-याच्या दडपणाखाली त्याला देखील परवाना दिला गेल्याचे म्हटले जात आहे. दीपककुमार गुप्ता यांच्या तक्रार अर्जावर पोलिस अधिक्षक काय भुमिका घेतात याकडे संबंधीतांचे लक्ष लागून आहे.