जळगाव दि. १२ प्रतिनिधी – गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारोहाच्या निमित्ताने ‘गांधीतीर्थ प्रश्नमंजुषा’चे दि. १५ ते १७ ऑगस्ट दरम्यान आयोजन केले आहे. या दरम्यान ‘गांधीतीर्थ’ या जगप्रसिद्ध संग्रहालयाला भेट देणाऱ्या प्रत्येक अभ्यागतांसाठी या स्पर्धेत भाग घेता येणार आहे. या काळात संग्रहालय पाहिल्यानंतर त्यावर आधारित प्रश्न अभ्यागतांना विचारण्यात येतील. तीन सलग प्रश्नांना बरोबर उत्तर देणाऱ्यास आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहे.
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधीतीर्थला देश-विदेशातील लाखो लोकांनी आजपर्यंत भेट दिली आहे. जळगावातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी संस्था विविध उपक्रम राबवीत असते. यावर्षी गांधीतीर्थ प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले आहे. याचा जळगाव शहरातील नागरिकांसह, विद्यार्थी, शाळा-महाविद्यालये यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गांधी रिसर्च फाउंडेशनच्यावतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.