जळगाव : जळगाव शहरातील केबल नेटवर्कवर प्रसारीत होत असलेल्या पाकिस्तानी चॅनल बाबत सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी स्थानिक प्रशासनापासून पंतप्रधान कार्यालयापर्यंत तक्रारी केल्या आहेत. दरम्यान जळगाव शहरात सुरु असलेल्या या पाकिस्तानी चॅनलवरील कार्यक्रमांमुळे खळबळ माजली आहे.
जळगाव शहरात दोन मोठ्या स्वरुपाचे केबल नेटवर्क सुरु आहेत. यातील एक केबल नेटवर्क खा. रक्षा खडसे यांच्या अधिपत्याखाली सुरु असल्याचे म्हटले जात आहे. हजारोच्या संख्येत ग्राहक असलेल्या केबल नेटवर्कच्या माध्यमातून पाकिस्तानी कार्यक्रम सुरु असल्याची गोपनीय माहिती सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांना समजली. त्या माहितीची खात्री होण्यासाठी गुप्ता यांनी त्या कार्यक्रमांचे स्क्रिन शॉटस उपलब्ध केले आहेत. केटीएन न्यूज, केटीएन संगीत, केटीएन कशिष, सिंध टीव्ही, सिंध न्यूज असे हे प्रमुख पाकिस्तानी चॅनल आहेत.
14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानातील स्वतंत्रता दिनाचा कार्यक्रम, पाकिस्तानी नागरिकांचे नारेबाजी आदी दृश्य या चॅनलवर दाखवण्यात आले असल्याचे गुप्ता यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमांचे स्क्रिन शॉट त्यांनी दिले आहेत. याप्रकरणी योग्य ती चौकशी आणि कारवाई होण्याची मागणी दीपककुमार गुप्ता यांनी स्थानिक प्रशासनासह पंतप्रधान कार्यालयाकडे केली आहे.