जळगाव : एमपीडीए कायद्याखाली जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुका पोलिस स्टेशन आणि चोपडा शहर पोलिस स्टेशन हद्दीतील दोघांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला विविध गुन्हे दाखल असलेला इब्राहीम उर्फ टिपू उर्फ टिप्या साततार मण्यार (रा. वराडसीम ता. भुसावळ) आणि आकाश संतोष भोई (रा. साने गुरुजी वसाहत चोपडा) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
इब्राहीम उर्फ टिपू याच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला तीन, फैजपुर आणि शनीपेठ पोलिस स्टेशनला प्रत्येकी एक तसेच एमआयडीसी पोलिस स्टेशनला दोन असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत. भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला त्याच्याविरुद्ध दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाया झाल्या आहेत. तरीदेखील त्याच्या वर्तणूकीत बदल झाला नाही. याची येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे रवानगी करण्यात आली आहे.
चोपडा शहरातील आकाश संतोष भोई याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलिस स्टेशनला सहा आणि अमळनेर पोलिस स्टेशनला एक असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत. याशिवाय चोपडा शहर पोलिस स्टेशनला अदखलपात्र दोन गुन्हे दाखल आहेत. चोपडा शहर पोलिस स्टेशनला त्याच्याविरुद्ध पाच वेळा प्रतिबंधात्मक कारवाया झाल्या आहेत. याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या कारवाईकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या सह त्यांचे सहकारी आणि संबंधित पोलिस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांनी सहकार्य केले.