जळगाव दि.१८ प्रतिनिधी – जपान मध्ये वाकायामा येथे आशियाई आणि ओशनियन हायस्कूल विद्यार्थी मंचच्या वतीने आयोजित केलेल्या ‘शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षण परिषद’ मध्ये भारताच्यावतीने एकमेव शाळा, अनुभूती रेसिडेन्शिअल स्कुल, जळगावचा विद्यार्थी, अतिशय जैन याने आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करीत “भारतातील जल समस्या आणि त्यावरील उपाययोजना” या विषयावर संशोधन सादर केले.
या परिषदेत विविध २२ देशांतील शाळांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यांत विद्यार्थी प्रतिनिधींद्वारे जागतिक पातळीवर होणारे बदल आणि त्याचा त्यांच्या देशातील वातावरण, भौगोलिक, पर्यावरण, शिक्षण इ घटकांवर होणारे परिणाम आणि त्यावर करता येऊ शकणाऱ्या उपाय योजनांवर संशोधन सादर केली जातात. या परिषदेमध्ये अनुभूती स्कूलचा विद्यार्थी अतिशय जैन, शिक्षक स्वागत रथ यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. भारताचे महावाणिज्य दूत निखिलेश गिरी, जपान वाकायामाचे गर्व्हनर किशीतमोटो शुहेई यांनी हा गौरव केला. या आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या परिषदेत २०१४ पासून दरवर्षी अनुभूती रेसिडेन्शिअल स्कुल भारताचे प्रतिनिधित्व करीत असून आतापर्यंत अनुभूती रेसिडेन्शिअल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, अन्न-सुरक्षा, त्सुनामी अशा विविध पर्यावरण आणि मानवी विकास समस्यांवरील विषयांचे सादरीकरण केले आहे.
या अत्यंत महत्वाच्या जागतिक पातळीवरील परिषदेत सहभागी होण्यासाठी अनुभूती स्कुलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा अनिल जैन यांचे अनमोल सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. शाळेच्या वतीने या दौऱ्यासाठी वाणिज्य शिक्षक स्वागत रथ यांची विद्यार्थी प्रतिनिधी अतिशय जैन याला मार्गदर्शक सोबती म्हणून निवड केली होती.