सोलापूर : निलंबित सहायक पोलिस निरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे यांच्या खून प्रकरणाचा उलगडा सोलापूर (ता. सांगोला) पोलिसांनी तब्बल सोळा दिवसांनी उघडकीस आणला आहे. सहायक पोलिस निरीक्षक सुरज चंदनशिवे आणि मुंबई पोलिस दलातील कर्मचारी सुनिल मधुकर केदार यांच्यातील आर्थिक वाद या खूनाला कारणीभूत असल्याचे तपासाअंती उघडकीस आले आहे. हा खून करणा-या संशयीत आरोपी तथा पोलिसकर्मी सुनिल केदार व त्याचा साथीदार विजय बबन केदार या दोघांना अटक करण्यात आली आहे.
2 ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी निलंबीत सहायक पोलिस निरीक्षक सुरज चंदनशिवे हे शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी धारदार शस्त्राने त्यांची हत्या झाली होती. त्यांचा मृतदेह नजीकच्या शेतात टाकून देण्यात आला होता. सुनील केदार व विजय केदार या दोघांना 24 ऑगस्ट पर्यंत सहा दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक सुरज चंदनशिवे आणि मुंबई पोलिस दलाच्या मुख्यालयात कार्यरत असलेला पोलिस अंमलदार सुनील केदार या दोघांची मैत्री होती. त्या मैत्रीतून सुनिल केदार याने चंदनिशवे यांच्यासाठी खर्च केला होता. सुनील केदार हा दिलेले पैसे, तसेच खर्च सपोनि चंदनशिवे यांच्याकडे मागत होता. हा वाद गेल्या वर्षभरापासून सुरु होता. या वादातून सूरज चंदनशिवे यांचा खून झाल्याचा तपास पोलिसांनी केला आहे.
पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सहायक पोलिस निरीक्षक सचिन जगताप, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत कुमार काटकर, सहायक पोलिस निरीक्षक आदिनाथ खरात, पोलिस उपनिरीक्षक पोपट काशीद, सहायक फौजदार कल्याण ढवणे, पोलिस हेडकॉन्स्टेबल अप्पा पवार, पोलिस हवालदार अभिजित मोहोळकर, पोलिस नाईक दत्ता वजाळे, पोलिस कॉन्स्टेबल मारुती पांढरे यांनी केली.