एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणारा नाशिक पोलिसांच्या ताब्यात

नाशिक : विविध बँकांच्या एटीएम केंद्रात जाऊन मदत करण्याचा बहाणा करत हातचलाखीने एटीएम कम डेबिट कार्डची कधी अदलाबदल तर कधी नवीन पिन क्रमांक जनरेट करण्याचे कारण सांगून ग्राहकांच्या रकमेवर डल्ला मारणा-या महाठकास नाशिकच्या आडगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे. संतोष हरिश्चंद्र मोहीते असे ठाणे जिल्ह्याच्या उल्हासनगर येथील रहिवासी असलेल्या ठगबाजाचे नाव आहे. त्याच्या कब्जातून एकुण 53 एटीएम कम डेबीट कार्ड हस्तगत करण्यात आली आहेत.

संतोष मोहीते याच्याविरुद्ध राज्यात अशाप्रकारे फसवणूक केल्याचे 18 गुन्हे दाखल आहेत. त्याने लाखो रुपयांचा नागरिकांना चुना लावला आहे. दिंडोरी जऊळके येथील रहिवासी असलेले दिनेशकुमार राजपत मिश्रा हे आडगाव परिसरातील स्टेट बँकेच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी आले होते. त्यावेळी संशयित मोहिते याने त्यांना पिन क्रमांक जनरेट करून देण्याचा बहाणा करत त्यांचे डेबिट कार्ड हातोहात लंपास केले. दिनेशकुमार मिश्रा यांच्या बँक खात्यातून नंतर 24 हजार रुपयांची रोकड त्याने काढून घेतली होती.

याप्रकरणी दिनेशकुमार मिश्रा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आडगाव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. आडगाव पोलिस पथक परिसरातील विविध एटीएम केंद्रावर संशयिताचा शोध घेत होते. दरम्यान जऊळके येथील एटीएम केंद्रावर नागरिकांच्या रांगेत संशयित मोहिते हा तोंडावर मास्क लावून उभा असल्याचे पोलिस पथकाने हेरले. त्याला शिताफीने चौकशीकामी ताब्यात घेत पोलिस स्टेशनला आणले गेले. अंगझडती दरम्यान त्याच्या कब्जातून विविध बँकांचे तब्बल 53 डेबिट कार्ड व एक मोठा रामपुरी चाकू हस्तगत करण्यात आला.

राज्यातील विविध शहरांमध्ये भ्रमंती करुन स्वतःजवळ असलेल्या विविध डेबिट कार्डची अदलाबदल करुन नागरिकांना गंडा घालण्याचे काम संशयित मोहिते करत होता. तो पोलिसांना हवाच होता. तोंडाला मास्क लावून तो गुन्हे करत असल्यामुळे ओळखून येत नव्हता. ज्या एटीएम केंद्रावर त्याने नागरिकाला फसवले, त्याच केंद्रावर तो आडगाव पोलिसांच्या हाती लागला. या चोरट्याने नाशिक शहरातील उपनगर, देवळाली कॅम्प या भागातसुद्धा अशाप्रकारे ठकबाजी केली आहे. त्याच्याकडून असे अजून गुन्हे उघडकीस येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here