जळगाव दि. २४ (प्रतिनिधी) – साहित्यसृष्टीत बावनकशी सोनं असलेल्या, ज्यांच्या कवितेतून जनसामान्यांना जगण्याची स्फूर्ती प्राप्त होते अशा खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा सुप्रसिद्ध साहित्यिक जगदीश देवपूरकर यांनी व्यक्त केली आणि उपस्थित सर्व साहित्यिकांनी त्यास अनुमोदन दिले. बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अँड कांताबाई जेन फाऊंडेशनतर्फे चौधरी वाड्यात ‘बहिणाई स्मृती’ येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची १४३ वी जयंती साजरी करण्यात आली त्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या वेळी बहिणाबाईंच्या नातसून पद्माबाई चौधरी, बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टच्या विश्वस्त सौ. ज्योती जैन, श्रीमती स्मिता चौधरी, दिनानाथ चौधरी तसेच वाड्यातील नागरिक उपस्थित होते.
प्रस्तुत कार्यक्रमाच्या उत्तरार्धात कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रमाचे बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या फेसबुकवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. कविवर्य अशोक पारधे, अरुण पाटील, वंदना चव्हाण, सौ. वंदना महाजन, शीतल पाटील, पुष्पा साळवे, निशा कोल्हे आणि ज्ञानेश्वर शेंडे यांनी सादरीकरण केले. सहभागी कवी कवयित्रींना बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन समन्वयक अशोक चौधरी यांनी केले. या प्रसंगी बहिणाबाई चौधरी ट्रस्टच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. देवेश कैलास चौधरी, सौ. रंजना चौधरी, प्रिया, शोभाबाई, कविता चौधरी, विकास मल्हारा, विजय जैन, किशोर कुळकर्णी, देवेंद्र पाटील, किशोर पाटील, प्रदीप, ज्ञानेश्वर सोनार आदी उपस्थित होते.