जळगाव : बंद घराचा कडीकोंडा तोडून घरातील दागिने व रोख रक्कम चोरुन नेणा-यास त्याच्या साथीदारांसह एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने सुरत येथून अटक केली आहे. याशिवाय जळगाव शहरातून त्याच्या दोघा साथीदारांना देखील अटक करण्यात आली आहे. यामधे एका महिलेचा समावेश आहे. एका विधीसंघर्षीत बालकाला देखील या गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आले आहे. इश्तियाक अली राजीक अली असे सुरत येथून अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. हसीनाबी राजीक अली व अनिस हमीद शेख अशी इतर दोघा साथीदार गुन्हेगारांची नावे आहेत.
26 जूनच्या रात्री ते 8 जुलैच्या पहाटे दरम्यान हा घरफोडीचा प्रकार झाल्याचे उघड झाले होते. या कालावधीत जळगाव शहरातील तांबापुरा भागातील रहिवासी असलेली तसलीमबी मोहम्मद सैय्यद ही वयोवृद्ध महिला बकरी ईद सणानिमीत्त धुळे येथे तिच्या मुलीकडे गेली होती. या कालावधीत या महिलेच्या बंद घराचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी घरातील 23 हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व 25 हजार रुपये रोख असा एकुण 48 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता. याबाबत एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासाअंती हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार इश्तियाक अली राजीक अली याने त्याच्या साथीदारांसह केला असल्याचे पो.नि. जयपाल हिरे यांच्या निदर्शनास आले. तो सुरत येथे लपून बसला असल्याची गोपनीय माहिती पो.नि. जयपाल हिरे यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे पो.हे.कॉ. रामकृष्ण पाटील, पो.ना. सचिन पाटील, पो. कॉ. मुकेश पाटील, छगन तायडे आदींचे एक पथक तयार करुन सुरत येथे रवाना करण्यात आले. सुरत येथून त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्याने आपला गुन्हा कबुल करत इतर साथीदारांची तसेच विधीसंघर्षीत बालकाचे नाव उघड केले. त्याच्या कब्जातून चोरीच्या मुद्देमालापैकी पाच हजार रुपये रोख व दागिने असा एकुण 22 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटकेतील आरोपींकडून चोरी, घरफोडीचे इतर गुन्हे देखील उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप निरी. दिपक जगदाळे, पो.हे.कॉ. रामकृष्ण पाटील, सचिन पाटील, अल्ताफ पठाण, सचिन मुंढे, मुकेश पाटील, छगन तायडे, योगेश बारी आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला.