पिंपरी : पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड दहशत असलेल्या कुख्यात वाळू तस्कराला पोलिसांनी जेरबंद केले आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी या कारवाईला मुर्त स्वरुप दिले. सोमनाथ उर्फ सोमाभाई रमेश चव्हाण (30) रा. कालगाव ता. कराड जि. सातारा असे अटकेतील वाळू तस्कराचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून चार पिस्टल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहे.
याशिवाय अजून एकाला अटक केली असून त्याच्याकडून देखील एक पिस्टल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सोमनाथ उर्फ सोमाभाई रमेश चव्हाण (३०) रा. कालगाव, ता. कराड, जि. सातारा तसेच संतोष चंदू राठोड (२३) रा. तळेगाव दाभाडे असे अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत.जुलै 2020 मधे अवैध अग्निशस्त्रांचा व्यापार करणाऱ्या मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील आंतरराज्यीय टोळीचा पोलिसांकडून पदार्फाश करण्यत आला होता. त्यावेळी १९ लाख ८९ हजार ५०० रुपये किमतीच्या ४२ पिस्टल, गावठी कट्टे तसेच ६४ काडतुसे जप्त करण्यात आली होती. याप्रकरणी १५ आरोपींना अटक करण्यात आली होती. अटकेतील आरोपींची नावे निष्पन्न करण्यात आली होती. त्या आरोपींमधे संतोष चंदू राठोड याचा देखील सहभाग होता.
आरोपी संतोष याच्यावर सन २०१८ मध्ये लोणावळा पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल आहे. आरोपी संतोष त्या खूनाच्या गुन्हयातून येरवडा तुरुंगातून बाहेर आला होता. १० ऑगस्ट रोजी चिंचवड परिसरातून त्याला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याच प्रकरणात सातारा जिल्ह्यातील कुख्यात वाळू तस्कर सोमनाथ चव्हाण याचे नाव देखील पुढे आले.काही दिवसांपुर्वी दरोडा टाकण्याच्य तयारीत असतांना उंब्रज पोलिसांनी त्याला अटक केली होती. शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत देखील त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.
सातारा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असतांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी सोमनाथ यास 17 ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून चार गावठी पिस्टलसह दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.आरोपी सोमनाथ हा कुख्यात वाळू तस्कर असून सातारा परिसरात त्याची ‘शूट ग्रुप’ नावाची गुन्हेगारी टोळी आहे. तसेच तो ‘आई साहेब प्रतिष्ठान’ नावाची संघटना देखील चालवतो. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि ठाणे या चार जिल्ह्यात त्याची मोठी दहशत आहे. गंभीर स्वरुपाचे १८ गुन्हे त्याच्या नावावर नोंद आहेत. निगडी परिसरात सन २०१६ मध्ये कुख्यात गुंड कृष्णा डांगे उर्फ केडी भाई याची हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणात सोमनाथ चव्हाण हा प्रमुखआरोपी आहे. सन २०१८ मध्ये भाजपा ठाणे जिल्हा उपाध्यक्षावर जिवघेणा हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात सोमनाथ मुख्य सूत्रधार होता.