जळगाव : पन्नास हजाराच्या रकमेची लाच मागितल्याप्रकरणी तत्कालिन जिल्हा आरोग्य अधिका-याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. देवराम किसन लांडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तत्कालिन जि.प. जिल्हा आरोग्य अधिका-याचे नाव आहे. डॉ. देवराम लांडे हे सध्या पाचोरा येथे तालुका आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
22 जून 2023 रोजी डॉ. देवराम लांडे यांनी तक्रारदारास पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी त्यांचे घर व जागा भाडेतत्त्वावर आरोग्य विभागाच्या आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी भाड्याने देण्याबाबत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जळगाव येथे अर्ज सादर केला होता. तक्रारदार यांची जागा आरोग्य विभागाकडून भाडेतत्त्वावर घेवून त्यांना नियमित भाडे सुरू करण्यासाठी डॉ देवराम लांडे यांनी पंचासमक्ष लाचेची मागणी केली होती. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे लाचलुचपत विभागाचे पोलिस उप अधिक्षक अभिषेक पाटील यांच्या अधिपत्याखाली पो नि रूपाली खांडवी, पोहवा राजन कदम, शरद कटके, पोशि संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, गायत्री पाटील चालक पोहवा सुधीर मोरे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.