विषारी कोब्रा पत्नीच्या अंगावर सोडला; प्रेयसीच्या नादी लागून गजाआड झाला

केरळ : विवाहित मनुष्याच्या आयुष्यात एखाद्या परस्त्रीचे आगमन वादाचे कारण होत असते. परस्त्रीच्या नादी लागलेला मनुष्य ब-याचदा वेडापिसा होत असतो. मनुष्य संयमी अथवा कुटूंबवत्सल असेल तर तो परस्त्रीच्या नादी न लागता सुरक्षीत राहण्याचा प्रयत्न करतो. मात्र काही काही लोक परस्त्रीच्या नादात आकंठ बुडालेले असतात. त्यांना जगाचे अथवा आपल्या सुविद्य पत्नीचे देखील भान रहात नाही. परस्त्रीसोबत प्रेमाचा सिलसिला सुरु असतांना आपण विवाहित आहोत याचे त्याला भान रहात नाही. परस्त्रीसोबतचे अनैतिक संबंध त्याला स्वस्थ बसू देत नाही. त्याला पत्नीची अडचण वाटू लागते. मग त्यातून विविध कुविचार त्याच्या मनात येतात. काही काही महाभागांच्या मनात पत्नीचा कायमचा काटा काढण्याचे  विचार थैमान घालतात. त्यासाठी असे लोक वेगवेगळी शक्कल लढवातात.

केरळ राज्याच्या कोल्लम जिल्ह्यातील आंचल येथे राहणाऱ्या विवाहीत सुरजच्या जीवनात अशीच एक दुसरी तरुणी आली होती. तो त्या तरुणीच्या  प्रेमात आकंठ बुडाला होता. त्यामुळे त्याने पत्नीचा काटा काढण्यासाठी चक्क तिच्या अंगावर विषारी साप सोडण्याचे दुष्कृत्य केले होते. पत्नीचा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू भासवण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याच्याकडून गुन्हा वदवून घेत त्याला शिताफीने अटक केली.

कोल्लम जिल्हयातील आंचल येथील सुरज ही तसाच होता. त्याचे उथरा हिच्याशी गेल्या दोन वर्षापुर्वीच समाजाच्या रितीरिवाजानुसार लग्न झालेले होते. तो कोल्लम येथील एका बँकेत नोकरीला होता. उथरा ही दिसायला देखणी आणि सुंदर होती. सुरूवातीला त्या दोघांचा संसार राजा राणी सारखा बहरत आणि फुलत होता.सकाळी घरातुन नोकरीसाठी गेलेला सुरज संध्याकाळी उशिरा घरी परत येत होता. कामाच्या निमित्ताने तो बाहेर जात असल्याने त्याची पत्नी उथरा त्याला समजून घेत होती.

अलिकडे मात्र सकाळी लवकर गेलेला सुरज रात्री उशिरा घरी परतत होता. सुटीच्या दिवशी देखील तो घरात थांबत नव्हता. याबाबत त्याला पत्नी उथरा हिने विचारले असता तो तिला बँकेत जास्त काम असल्याचे कारण सांगून वेळ मारुन नेत होता. तिचा स्वभाव भोळा भाबडा असल्याने ती देखील त्याच्यावर डोळे झाकुन विश्वास ठेवत होती. तो मात्र तिच्या याच स्वभावाचा गैरफायदा घेत होता. आता तर तो बँकेत काम जास्त असल्याचे सांगुन दोन तीन दिवस घरी येत नव्हता.

अलिकडे मात्र सुरजचा स्वभाव काहीसा विक्षिप्त झाला होता. तो किरकोळ कारणामुळे पत्नीसोबत वाद घालून तिला मारहाण करत होता. आपला काही दोष नसतांना सुरज आपल्यासोबत का उगीचच भांडण करतो याचे कारण तिने शोधण्याचा प्रयत्न केला. एकदा तिने त्याच्या पश्चात  त्याचा मोबाईल तपासला. त्यात तो एका महिलेसोबत रिलेशनमध्ये असल्याचे तिला समजले. तो त्या परस्त्रीसोबत तासनतास मोबाईलवरून बोलत होता. तिच्याशी व्हॉट्सअॅपवरून चॅटिग करत होता. याबाबत तिने त्याला विचारणा केली. त्यावेळी त्याने तिच्यासोबतचे आपले संबंध मान्य करुन आपले तिच्याशी शारीरिक संबंध असल्याचे सांगितले. त्याने पत्नीला त्या परस्त्रीसोबतच्या काही अश्लिल चित्रफिती देखील दाखवल्या.

आपला पती बाहेर गुंतला असल्याचे समजल्याने तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. आता तीदेखील त्याच्यासोबत या कारणामुळे भांडण करत होती. ती त्याच्यावर कायम लक्ष ठेवू लागली. तो कुठे जातो, काय करतो हे ती बघत होती. तिला ही आता त्या दोघांचे संबंध फार पुढे गेले असल्याचे समजले होते.

या कारणावरुन दोघांचा वाद विकोपाला जात होता. या भांडणात तो तिला मला घटस्फोट मागत होता. सुरजला काही ही करुन पत्नी उथरापासुन सुटका हवी होती. त्याला त्याच्या प्रेयसीसोबत लग्न करायचे होते. पत्नी उथराला मारून टाकल्या शिवाय प्रेयसीसोबत विवाह करता येणार नाही हे त्याने ओळखले होते. सरळमार्गी ती त्याला सोडचिठ्ठी देणार नव्हती. एकदा ती झोपली असताना तिला मारण्यासाठी त्याने तिच्या अंगावर विषारी साप सोडला होता. त्यावेळी तिला वेळीच उपचार मिळाल्याने ती त्यातून बचावली होती. याबाबत तिने आपल्या माहेरच्या लोकांना ही सांगितले होते.आपला पती परस्त्रीच्या नादी लागून आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे तिने आईवडीलांना सांगितले. तिच्या आईवडीलांनी त्याची समजूत काढून त्या महिलेचा नाद सोडण्यास सांगितले.

आता त्याच्या डोक्यात पत्नीला कायमचे संपविण्याचे विचार येत होते. काहीही करुन त्याला पत्नीला ठार करुन प्रेयसीसोबत लग्न करायचे होते. त्यातच त्याच्या प्रेयसीने त्याच्या मागे लग्नाचा तगादा लावला होता. त्याला ही काय करावे हे सुचत नव्हते. त्यातच एकदा मोबाईलवरील युटुयबवर विषारी सापांचा एक व्हिडीओ त्याच्या पाहण्यात आला. त्यावरुन त्याला एक चुकीची कल्पना सुचली होती. त्याने विषारी साप पकडणारे शोधून काढले.

त्यातच त्याची मैत्री सुरेश नावाच्या तरुणासोबत झाली. सुरेश हा विषारी साप पकडण्यात प्रविण होता. आता सुरजने सुरेशला हाताशी धरून पत्नीला संपविण्याचा कट रचला. सुरेशला कोब्रा विषारी साप पकडण्याचे ज्ञान होते. युटुयबवरील विषारी सापांचा तो व्हिडीओ पाहुन सुरजने सुरेशकडे एक कोब्रा विषारी साप खरेदी केला. त्याचे पैसे त्याने सुरेशला दिले. याशिवाय पत्नीला मारण्याचे वेगळे पैसे देण्याचे सुरजने मान्य केले. सुरेशसोबत राहून राहून सुरजला आता विषारी सापांचे ज्ञान मिळाले होते. साप कसे पकडायचे हे देखील सुरज शिकला होता.

२ मे २०२० रोजी रात्री पत्नी उथरा ही आपल्या रुममध्ये झोपली होती. त्यावेळी त्याने सुरेशला विषारी कोब्रा साप घेवून येण्यास सांगितले. त्याने तो कोब्रा विषारी साप एका पिशवीतुन आणला. रात्री उशिरा त्या दोघांनी तो कोब्रा साप उथरा झोपलेल्या खोलीत हळूच सोडला. ती गाढ झोपेत होती. त्यावेळी तो विषारी साप तिच्या आजुबाजुला वळवळत होता. सुरजच्या सांगण्यावरुन सुरेशने तो साप उचलून उथराच्या अंगावर टाकला. कुणीतरी आपल्याजवळ असल्याची चाहुल लागताच उथरा खाडकन जागी झाली. तेवढयात त्या सापाने उथराला दोनदा डंख मारला. तिच्या तोंडातुन फेस येऊ लागला होता. ती वाचवा वाचवा म्हणुन ओरडत होती. मात्र त्या दोघांनी दरवाजा बाहेरुन बंद केल्याने तिच्या किंचाळण्याचा आवाज बाहेर गेला नाही. काही वेळातच तिची तडफड बंद झाली. तिचा जागीच मृत्यु झाल्यानंतर सुरेश तेथून निघुन गेला.

उथराला दंश केल्यानंतर तो कोब्रा साप बाहेर निघून गेला. साप बाहेर गेल्यानंतर गोंधळ निर्माण होण्याच्या भितीने सुरजने सापाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो साप त्याच्या हाती लागला नाही. त्या रात्री रुममध्ये सुरजला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने पत्नीचा नैसर्गिक मृत्यु झाल्याचे नाटक सुरु केले. शेजाऱ्यांनी रुममध्ये जावुन पाहिले असता उथराच्या तोंडातुन फेस येत होता. घरात एसी सुरू होता. दारे खिडक्या बंद होत्या. त्यामुळे तिचा मृत्यु संशयास्पद वाटत होता.

आजुबाजूच्या लोकांनी या घटनेची माहिती पोलीसांना दिली. पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात रवाना केला.  पोलीसांनी या घटनेची माहिती मयत उथराच्या माहेरच्या लोकांना दिली. त्यांनी ही घटनास्थळी येऊन पाहिले. त्याना तिचा मृत्यु संशयास्पद वाटला. त्यांनी तिच्या संशयास्पद मृत्युबद्दल जावई सुरज याच्यावर संशय व्यक्त केला. याचे कारण म्हणजे यापुर्वी देखील एकवेळा भांडणात सुरजने तिला मारण्यासाठी तिच्या अंगावर साप सोडला होता.

त्यावेळी तिच्यावर वेळीच उपचार झाल्याने ती बचाचली होती. मयत उथराच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीसांनी सुरजला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. तो पोलीसांना उडवा उडवीची उत्तरे देत होता. पोलीसांनी त्याला खास पोलीसी पाहुणचार दिल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबुल केला.

पोलीसांनी उथरा हिच्या खूनाबद्दल तिचा पती सुरज याच्याविरोधात भा.द.वि. ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता. न्यायालयाने त्याला सुरुवातीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडी दरम्यान पोलीसांनी सुरज याने दिलेल्या माहितीवरून या कटात सहभागी असल्याबद्दल त्याचा मित्र सुरेश याला देखील ताब्यात घेतले.त्याने आपला गुन्हा कबुल केल्याने पोलीसांनी त्याला देखील अटक केली.

निव्वळ प्रेयसीच्या नादी लागून सुरजने पत्नीला मारण्यासाठी साप पकडण्याचे प्रशिक्षण घेतले होत्ते. प्रेयसीच्या नादी लागून सुरज कोणत्या थराला गेला होता हे या घटनेवरुन दिसून येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here